तैवानमधील वर्ल्ड मास्टर्स क्रीडा स्पर्धा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
तैवानमध्ये सुरू असलेल्या 11 व्या वर्ल्ड मास्टर्स क्रीडा स्पर्धेत भारतीय लष्कराच्या मेजर रोहित कादियन यांनी चार पदके पटकावत भारताचा गौरव वाढविला. 17 मेपासून सुरू झालेली ही स्पर्धा 30 मेपर्यंत चालणार आहे. ‘निवडक आंतरराष्ट्रीय खेळाडू व माजी ऑलिम्पियन्सचा समावेश असलेल्या या स्पर्धेत मेजर रोहित यांनी धैय, दृढनिश्च आणि जागतिक दर्जाच्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करीत जागतिक व्यासपीठावर आपला ठसा उमटवलाय,’ असे एका वरिष्ठ सेनाधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी मिळविलेल्या चार पदके मिळविण्याची उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या वैयक्तिक उत्कृष्टतेलाच अधोरेखित करीत नाही तर भारतीय सैन्याची परिभाषा देणारी लवचिकता आणि शिस्तीची भावनादेखील अधोरेखित करते,’ असेही हा लष्करी अधिकारी म्हणाला. या स्पर्धेत त्यांनी 1500 शर्यतीत (40-45 वयोगट) सुवर्ण जिंकत वर्ल्ड चॅम्पियनचा बहुमान मिळविला. याशिवाय 800 मी. व 5000 मी. शर्यतीत त्यांनी रौप्य आणि 400 मी. शर्यतीत कांस्यपदकही मिळविले. मेजर कादियन यांचे यश देशभरातील नवोदित खेळाडू व सैनिकांसाठी प्रेरणास्थान आहे. भारतीय सैन्य त्यांच्या रँकमधील क्रीडा प्रतिभेला जोपासत असून त्यांच्या वचनबद्धतेला पुन्हा पुष्टी देते, असेही ते म्हणाले.









