बाबुल सुप्रियोंसह 6 मंत्र्यांच्या खात्यात बदल
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात सोमवार, 11 सप्टेंबर रोजी मोठा बदल करण्यात आला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सहा मंत्र्यांच्या खात्यात बदल केला आहे. बाबुल सुप्रियो यांच्याकडून पर्यटन विभाग काढून घेण्यात आला असून त्यांच्याकडे अक्षय ऊर्जा खाते देण्यात आले. तर इंद्रनील सेन यांच्याकडे पर्यटन खाते सोपविण्यात आले आहे. वनखाते असलेल्या ज्योतिप्रिया मलिक यांच्याकडे आता औद्योगिक पुनऊज्जीवन विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. पंचायत खाते सांभाळणाऱ्या प्रदीप मजुमदार यांच्याकडे सहकार खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. अऊप राय यांच्याकडे पूर्वी सहकार खाते होते. आता त्यांना अन्न प्रक्रिया खाते देण्यात आले आहे. गुलाम रब्बानी यांच्याकडून उद्योग व फलोत्पादन खाते काढून घेण्यात आले आहे.
धुपगुरीला उपविभागाचा दर्जा देण्याची घोषणा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धुपगुरीला उपविभागाचा दर्जा जाहीर केला आहे. धुपगुरीला या वर्षाच्या अखेरीस अधिकृतपणे उपविभागाचा दर्जा मिळेल हे सांगताना मला आनंद होत असल्याचे ट्विट ममता बॅनर्जींनी केले आहे. या निर्णयामुळे स्थानिक प्रशासनात सुधारणा होण्याबरोबरच या प्रदेशात विकासाचे नवीन मार्ग उघडेल. धुपगुरीच्या समृद्ध भविष्याला आकार देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालमधील धुपगुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. तृणमूलचे उमेदवार निर्मलचंद्र रॉय यांनी भाजपच्या तापसी रॉय यांचा पराभव केला.









