माजी आमदार किरण कांदोळकर यांचा आरोप : थिवीवासियांचा जोरदार विरोध कायम,प्राथमिक सभेला अनेकांची उपस्थिती
वार्ताहर/थिवी
थिवी पंचायत क्षेत्रात येणाऱ्या कोमुनिदादच्या 2 लाख चौ.मी. जमिनीत महाराष्ट्राचे वर्ल्ड पीस विश्वविद्यालय बांधण्यात येणार असून तो एक मोठा जमीन घोटाळा आहे. विश्वविद्यालयाच्या नावाने येथे दुसराच प्रकल्प आणण्याचा घाट भाजपचा आहे, मात्र तो प्रयत्न थिवीचे ग्रामस्थ व गोवेकार हाणून पाडतील, असा ठाम विश्वास माजी आमदार किरण कांदोळकर यांनी व्यक्त केला. थिवी येथे या नियोजित विश्वविद्यालयाला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. थिवीचे सरपंच व्यंकटेश शिरोडकर, पंचसदस्य शिवदास कांबळी, मायकल फर्नांडिस, गिता शेळके, समाजसेवक शंकर पोळजी, थिवी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष हेमंत कांबळी, विजय बाणावलीकर, रॉबर्ट कुलासो, जिल्हा पंचायद सदस्य कविता कांदोळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
दोन लाख चौ. मी. जमिनीची गरज काय?
किरण कांदोळकर पुढे म्हणाले की, कुठल्याही विश्वविद्यालयाला 2 लाख चौ.मी. जमिनीची गरज पडत नाही. एवढी मोठी जागा घेण्यामागे सरकारचा छुपा अजेंडा असेल. विश्वविद्यालयाच्या नावाने जागा घेऊन नंतर त्या जागेत हॉटेल्स किंवा इतर प्रकल्प उभारुन स्वत:चा फायदा करुन घेण्यास भाजप सरकार मागे पुढे पाहणार नाही. थिवीत ज्या ठिकाणी हा प्रकल्प येणार आहे ती जागा डोंगर भागात आहे. या विश्वविद्यालयामुळे आपली नैसर्गिक संपत्ती नष्ट होणार आहे. आपल्या पूर्वजांनी निसर्गाच्या रक्षणासाठी हे डोंगर सांभाळून ठेवले होते. पण आज या भाजप सरकारचे समुद्रकिनाऱ्यानंतर आता डोंगर भागावर लक्ष गेले आहे. तेही ते विकून मोकळे होणार, असा आरोप किरण कांदोळकर यांनी केला.
प्रकल्प रद्द होऊ शकतो, पण आमदार झोपलेत
लोकांना प्रकल्प नको असेल तर ते रद्द होऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे डिचोली तालुक्यातील कुडचिरे गाव. या गावात कचरा प्रकल्प बांधण्यात येणार होता मात्र लोकांच्या विरोधामुळे तो रद्द झाला. लोकांना आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पाठिंबा दिल्यामुळे ते शक्य झाले. पण थिवी मतदारसंघाचे आमदार झोपले आहेत. त्यांना थिवीवासियांचे काहीच पडलेले नाही. त्यांना लोकांनीच जागा दाखवून दिली पाहिजे, असे किरण कांदोळकर म्हणाले.
सरकारला लोकांचे पडलेले नाही
सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी म्हणाले की, सध्या भाजप सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील जमिनींवर त्यांचे लक्ष आहे. सांकवाळ येथे भूतानी प्रकल्प, वेलसाव येथील रेल्वे डबल ट्रक, भोमा रस्त्याचे उदाहरण घ्या. त्यांना जनतेचे काहीच पडलेले नाही. खासगी वनक्षेत्राचे झोन बदलून पैसा कमविणे ऐवढेच त्यांना माहीत आहे. आज प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, असे ते म्हणाले. रॉबर्ट कुलासो म्हणाले की, आपण कुठल्याच शैक्षणिक संस्थेविरोधात नसून नैसर्गिक सौंदर्य राखण्यासाठी, या परिसरात राहाणाऱ्या धनगर समाजासाठी लढा देत आहोत. येथे विश्वविद्यालय कधीच होऊ देणार नाही असे त्यांनी सांगितले. म्हापसा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे म्हणाले की, गोवा विद्यापीठ 10 हजार चौ.मी.मध्ये आहे तर थिवीत येणाऱ्या विश्वविद्यालयाला 2 लाख चौ.मी. जागा कशासाठी पाहिजे, या मागे काही नेत्यांचा स्वत:चा स्वार्थ आहे, असा आरोप केला. थिवी काँग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष हेमंत कांबळी, विजय बाणावलीकर, पंचसदस्य शिवदास कांबळी, गॉडफ्री डिमिमा यांनी विश्वविद्यालयाला विरोध दर्शवला. बैठकीचे सूत्रसंचालन मॉली डिलिमा यांनी केले तर आभार पंचसदस्य गिता शेळके यांनी मानले.









