हमासच्या नेतृत्वालाच केले लक्ष्य : ट्रम्प यांना दिली होती पूर्वकल्पना
वृत्तसंस्था/ दोहा
इस्रायलने मंगळवारी कतारची राजधानी दोहा येथे हमासच्या वरिष्ठ नेतृत्वाला लक्ष्य करत हल्ला केला आहे. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईची पुष्टी दिली आहे. इस्रायलची सुरक्षा यंत्रणा शिन बेटने ही मोहीम साकारली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंजुरीनंतरच इस्रायलने हे अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. शस्त्रसंधीवरून हमासचे नेतृत्व अमेरिकेच्या नव्या प्रस्तावावर चर्चा करत होते.
हमासच्या दहशतवादी म्होरक्यांच्या विरोधात मंगळवारी केलेली कारवाई पूर्णपणे स्वतंत्र इस्रायली मोहीम होती. इस्रायलने याची सुरुवात केली, इस्रायलने याला संचालित पेले आणि इस्रायल याची पूर्ण जबाबदारी स्वीकारत असल्याचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर दोहाच्या आकाशात धूराचे लोट दिसून आले. कतारच्या अधिकाऱ्यांनी देखील या हल्ल्याची पुष्टी दिली आहे. परंतु हल्ल्यात किती जीवितहानी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे दोहामध्ये तणाव अन् भीतीचे वातावरण आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलमध्ये भीषण दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. त्यानंतर कतारमध्ये इस्रायलने केलेली ही दुसरी कारवाई आहे. हा हल्ला इस्रायलच्या वायुदलाकडून करण्यात आला असल्याचे इस्रायच्या सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. यादरम्यान कतार एअरवेजची उ•ाणे सुरळीतपणे जारी राहिली. तर कतार वायुदलाच्या कमीतकमी एका विमानाने देशाच्या सुरक्षेवर नजर ठेवण्यासाठी उ•ाण केले होते.
या हल्ल्याचा उद्देश हमास या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांना लक्ष्य करणे होता. हे दहशतवादी 7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यासाठी जबाबदार आहेत. नागरी हानी कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आली असून यात अचूक शस्त्रास्त्रांचा वापर आणि अतिरिक्त गुप्तचर माहिती सामील आहे. हमासच्या विरोधात दृढ संकल्पासोबत मोहीम जारी ठेवली जाणार असल्याचे इस्रायल डिफेन्स फोर्सने एक वक्तव्य जारी करत म्हटले आहे.
कतारमध्ये हमासचे म्होरके खलील अल-हैय्या आणि जाहेर जबरीनला इस्रायलने लक्ष्य केले आहे. इस्रायलचे सैन्यप्रमुख एयाल जामिर यांनी विदेशातील हमास म्होरक्यांना लक्ष्य करण्याचा इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता.
कतारने हल्ल्याला ठरविले भ्याड
इस्रायलच्या हल्ल्यानंतर कतार सरकारने याला भ्याड आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणारा ठरविले आहे. सुरक्षा दल, नागरी सुरक्षा आणि संबंधि यंत्रणांनी त्वरित पावले उचलली असून प्रभावित क्षेत्रांची सुरक्षा सुनिश्चित केली जात असल्याचे कतारच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल-अंसारी यांनी म्हटले आहे. इस्रायलच्या या प्रकारच्या वर्तनाला आम्ही सहन करणार नाही, कुठल्याही कारवाईला स्वत:ची सुरक्षा आणि सार्वभौमत्वाच्या विरोधात मानत उच्चस्तरीय चौकशी केली जात असल्याचा इशारा कतारने दिला आहे.









