सावळज/ वार्ताहर
Sangli News : सांगली जिल्ह्यातील सावळज येथील बीएसएनएलच्या (दुरसंचार) आॅफिसला रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता मोठी आग लागली. यामध्ये दुरसंचार विभागाच्या मशिन व केबल्स जळुन खाक झाल्या. ऑफिस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवल्याने होणारे मोठे नुकसान टळले. आगीचे कारण कळु शकले नाही.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, सावळज येथील सावळसिध्द विकास सोसायटीने दूर संचार विभागाला जागा भाड्याने दिलेली आहे. यामध्ये दूरसंचार विभागाच्या मोठ्या इलेक्ट्रॉनीक मशीन व मोबाईल टॉवर आहे. रविवारी रात्री साडेबारा वाजता अचानक ऑफिस मधून धुराचा व ज्वालांचा लोट येऊ लागला. परिसरातील नागरिकांनी याची कल्पना सोसायटी पदाधिकारी व दूरसंचार विभागातील कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर या आगीची कल्पना पोलीस व अग्निशामन दलाला देण्यात आली. तसेच परिसरातील विज बंद करुन आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
आगीचा लोट वर असलेल्या मोबाईल टॉवरकडे केबल जळत जाऊ लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी बीएसएनएलचे ऑफिस उघडून त्यातील अग्निशमन सिलेंडर चा उपयोग करून ऑफिस मधील आग नियंत्रणात आणली. तसेच मोबाईल टॉवर कडे जाणारे आगीवर पाण्याचा मारा करून आग पुर्णपणे विझवली. अग्निशामन दलाला आग विझली असल्याचे कळविण्यात आले आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दूरसंचार विभागाचे ऑफिस असलेल्या परिसरात विकास सोसायटीचे मुख्य कार्यालय पोस्ट ऑफिस तसेच अनेक दुकाने, केबल चँनेल ऑफिस व रहिवाशी घरे आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाल्याने होणारे मोठे नुकसान टळले. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. यावेळी चेअरमन दत्तात्रय पाटील, व्हा.चेअरमन बाळासो थोरात, संचालक संदिप माळी, प्रशांत कुलकर्णी, सचिव निलेश रिसवडकर, बाळासो हंकारे, प्रकाश पाटील, चंद्रकात पाटील, रविंद्र फासे, अमोल लिगाडे, ऑफिस कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.








