शेतकरी हतबल, वनखात्याकडून मिळणारी नुकसानभरपाई तोकडी : आयबॅक्स पुरवठा करावा, परवाना बंदूक चालवण्यास देण्याची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकरीवर्ग निसर्गाचा लहरीपणा तसेच वन्यप्राण्यांकडून उभ्या पिकावर होत असलेल्या आक्रमणामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. तसेच रोजगार हमी योजनेमुळे मजुरांच्या कमतरतेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती करणे अवघड बनले आहे. वनखात्याच्या निर्बंधामुळे वन्यप्राण्यांवर बंदूक चालवण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. निदान रानडुक्करांवर बंदूक चालवण्याचा परवाना द्यावा, तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना आयबॅक्स (झटका करंट) आणि सौरकुंपण तातडीने अनुदानावर देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
खानापूर तालुक्याचा पश्चिम आणि दक्षिण भाग पूर्णपणे जंगलाने व्यापलेला आहे. त्यातल्या त्यात पश्चिम भाग दुर्गम म्हणून ओळखला जातो. या भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या संख्येने आहे. 25-30 वर्षापूर्वी वन्यप्राण्यांकडून शेतीचे संरक्षण करण्यासाठी वन्यप्राण्यांवर बंदूक चालवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना होता. यासाठी शेतकऱ्यांना पीक संरक्षणार्थ बंदूक परवानेदेखील देण्यात आले. वन्यप्राणी संरक्षण कायदा अंमलात आणल्याने पीक संरक्षणातदेखील वन्यप्राण्यांवर बंदूक चालवण्याचा असलेला अधिकार काढून घेण्यात आला. त्यामुळे वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊ लागले. तसेच खानापूर तालुक्याचा पश्चिम आणि दक्षिण भाग हा राखीव जंगल तसेच अतिशय संवेदनशील क्षेत्र आणि भीमगड अभयारण्य घोषित करण्यात आल्याने शेतकऱ्यांवर वन्यखात्याकडून कठोर निर्बंध लादण्यात आले.
त्यामुळे गेल्या पंधरा-वीस वर्षात वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यात हत्ती, रानडुक्कर, गवे, चित्तळ, सांबर, मोर यासह इतर वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे.रानडुक्कर, गव्यांच्या कळपाणी तर पीक नुकसानीचा सपाटाच चालवला आहे. आता तर वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याने या सर्व वन्यप्राण्यांचा गावाजवळच वावर वाढलेला आहे. यामुळे आता वन्यप्राण्यांपासून आपल्या पिकाचे रक्षण कसे करावे, याची चिंता तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीला त्रासून शेती पड टाकली आहे. तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील शेतकऱ्यांनी शेजारील गोवा आणि महाराष्ट्र राज्यात नोकरी व्यवसायासाठी स्थलांतर केले आहे.
ब्रिटिशकाळापासून पीक संरक्षणासाठी रानडुक्करे किंवा गवीरेड्यांसारख्या प्राण्यांची शिकार करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना होता. आता वन्यप्राणी संरक्षण कायद्याची अत्यंत कडकरित्या अंमलबजावणी केली जात आहे. वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे तालुक्यातील शेती उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कापोली, गुंजी, हलशी, नागरगाळी, हलगा, गोधोळी, गोदगेरी, लोंढा, शिरोली, नेरसा, निलावडे, कणकुंबी, जांबोटी यासह या पूर्व-पश्चिम भागातील अनेक गावांना वन्यप्राण्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच हत्तींकडूनही पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.
भरपाई कवडीमोलाची : मिळण्यासाठी वर्षभर प्रतीक्षा
वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना वनखात्याकडून मिळणारी नुकसानभरपाई कवडीमोलाची आहे. आणि ती मिळवण्यासाठी सहा महिने तर वर्षभर वाट पहावी लागते. तसेच कित्येक वेळेला नुकसानभरपाई मिळत देखील नाही. यामुळे वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीविऊद्ध तक्रार करणेदेखील शेतकऱ्यांनी सोडून दिले आहे. वन्यप्राणी शेतवडीत येऊ नयेत, यासाठी वनखात्याने सोलार कुंपणाची योजना अंमलात आणली आहे. तसेच आयबॅक्स कुंपण (झटका करंट) आणि सोलार कुंपण ही योजना वनखात्याकडून शंभर टक्के अनुदानावर राबवणे गरजेचे आहे. तरच तालुक्यातील शेतकरी टिकेल, यासाठी लोकप्रतिनिधीनी आणि वनखात्याने प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच किमान राकडुक्कांवर तरी पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदूक चालवण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.









