मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : केएलई महाविद्यालयात प्रचार
बेळगाव : बेळगावच्या विकासामध्ये काँग्रेसची देणगी मोठी आहे. काँग्रेस सरकारकडून त्यावेळी केवळ एक रुपयामध्ये जमीन दिल्यामुळे आज केएलई रुग्णालय व विश्वविद्यालयाचा विकास झाला आहे. याला काँग्रेस पक्षच कारणीभूत आहे. बेळगावच्या विकासात भाजपचे काय योगदान आहे? असा प्रश्न मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. केएलई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बेळगावच्या विकासामध्ये काँग्रेसचे काय योगदान आहे आणि जगदीश शेट्टर यांचे काय योगदान? याचा निर्णय व्हावा. सामाजिक जबाबदारी जाणून घेऊन प्रत्येकाने मतदान करावे. हुबळी येथे जनतेकडून नाकारलेल्या व्यक्तीला बेळगावमधून विजयी करणे योग्य नाही. मृणाल हेब्बाळकर तरुण उमेदवार असून बेळगावच्या विकासाचे स्वप्न पाहिले आहे. त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेट्टर दोन वेळा मंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री राजकारणामध्ये चांगला अनुभव आहे. मात्र, त्यांना स्वत:ची शक्ती नाही. प्रचाराला गेलेल्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना पुढे केले जात आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मते मागितली जात आहेत. स्वत:ची ताकद नसणाऱ्या शेट्टर यांच्याकडून विकासाची अपेक्षा करणे अशक्य आहे. राजकारणाकडे आपण टाईमपास म्हणून पाहिलेले नाही. जनसेवा ही आपली वृत्ती आहे. माझ्याइतका अपमान सहन केलेले कोणी नाही. या सर्वाला समर्थपणे टक्कर देऊन पुढे आली आहे. आपण कधीही जातीचे राजकारण केले नाही. विकासाचे राजकारण केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चिक्कबळ्ळापूरचे आमदार प्रदीप ईश्वर, प्रा. राजीव गौड, उमेदवार मृणाल हेब्बाळकर, उदयकुमार शेट्टी, केएलई विद्यापीठाचे आजीव सदस्य डॉ. व्ही. एस. साधुन्नावर आदी उपस्थित होते.









