झॅम्पा, स्मिथ माघारी, मॅक्सवेलसह अन्य चार खेळाडूही परतणार
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
सध्या भारतातील टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन संघापैकी जवळपास निम्मा संघ तिसऱ्या सामन्यानंतर मायदेशी परतणार असून उर्वरित दोन सामन्यांसाठीच्या संघात ट्रेव्हिस हेड हा विश्वचषक विजेत्या संघातील एकमेव सदस्य राहिला आहे. मंगळवारच्या सामन्यानंतर रायपूर येथे 1 डिसेंबर रोजी आणि बेंगळूर येथे 3 डिसेंबर रोजी चौथा आणि पाचवा टी20 सामना खेळला जाईल.
ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या संघातील सात सदस्य 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना झाल्यानंतर पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतात राहिले. पण या सातपैकी सहा खेळाडू रायपूर आणि बेंगळूर येथील सामन्यांत दिसणार नाहीत. ज्याने विश्वचषकात 23 बळी घेतले आणि एका स्पर्धेत फिरकीपटूने सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत मुथय्या मुरलीधरनने नोंदविलेल्या विक्रमाशी बरोबरी केली तो अॅडम झॅम्पा स्टीव्ह स्मिथसह आधीच मायदेशी परतला आहे.
ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस आणि शॉन अॅबॉट हे इतर चार खेळाडूही आता ऑस्ट्रेलियाला परतणार आहेत. त्यांच्या जागी यष्टिरक्षक-फलंदाज जोश फिलिप आणि ‘बिग हिटर’ बेन मॅकडरमॉट आधीच ऑस्ट्रेलियन संघात सामील झाले आहेत, तर बेन द्वारशुईस आणि फिरकी गोलंदाज ख्रिस ग्रीन हे रायपूरच्या चौथ्या सामन्यापूर्वी संघात सामील होतील.
ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ : मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन द्वारशुईस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, एरॉन हार्डी, ट्रेव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.









