मुख्यमंत्री निवासस्थानासह आर्मी पॅन्टजवळ सापडले बॉम्ब : 24 ठिकाणे निशाण्यावर असल्याची धमकी
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममधील गुवाहाटीमध्ये शुक्रवारी दोन आयईडीसदृश उपकरणे सापडल्याने खळबळ निर्माण झाली आहे. तपासणीदरम्यान गेल्या 24 तासात एकूण 10 ठिकाणी बॉम्बसदृश साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रतिबंधित संघटना उल्फा (आय) ने राज्यात बॉम्बस्फोटांची मालिका घडवण्यासाठी 24 स्फोटके पेरल्याचा दावा केला आहे. या धमकीनंतर सुरक्षा दल सतर्क झाले आहे. नारेंगी आर्मी पॅन्टोन्मेंटजवळील सातगाव परिसरात सर्वप्रथम स्फोटके सापडली. त्यानंतर राज्य सचिवालय आणि मंत्री कॉलनीजवळील शेवटच्या गेटनजीक असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानाजवळही बॉम्बसदृश वस्तू सापडल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामने (उल्फा) अनेक मीडिया हाऊसना पाठवलेल्या ई-मेलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती. या ई-मेलमध्ये 24 ठिकाणांचा उल्लेखही करण्यात आला होता. त्यानुसार बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने तपासणी केली असता काही ठिकाणी संशयास्पद स्फोटक वस्तू सापडल्या आहेत. आता उर्वरित ठिकाणीही तपासणी केली जात असल्याचे गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दिगंत बराह यांनी सांगितले.









