लंडनमध्ये हल्ला करणाऱयांवर दिल्लीत युएपीए अंतर्गत गुन्हा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रीय गृह मंत्रालयाने लंडनमध्ये भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने करत तिरंग्याचा अपमान करणाऱया खलिस्तान समर्थकांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार लंडनमध्ये दूतावासावर हल्ला करणाऱया खलिस्तान समर्थकांवर गुन्हा नोंदविला आहे. या खलिस्तान समर्थकांच्या विरोधात युएपीए आणि पीडीपीपी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.
भारताचे नागरिक असूनही देशविरोधी निदर्शनांमध्ये सामील होणाऱया लोकांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. विदेश मंत्रालयाने केंद्रीय गृह मंत्रालयाला याप्रकरणी कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले हेते. यानंतरच गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना योग्य कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केली होती. दिल्ली पोलिसांच्या रडारवर भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने करणारे तसेच विदेशात राहून भारतविरोधी कारवायांमध्ये भाग घेणारे भारतीय नागरिक असल्याचे समजते.
19 मार्च रोजी लंडनमध्ये भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान समर्थकांनी निदर्शने केली होती. या निदर्शकांनी भारतीय दूतावासावर फडकविण्यात आलेला तिरंगा ध्वज खाली उतरविण्याचा प्रयत्न केला होता. तिरंग्याच्या अपमानावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भारत सरकारने दिल्लीतील ब्रिटिश राजदूताला पाचारण करत भारतीय दूतावासाच्या सुरक्षेबद्दल स्पष्टीकरण मागितले होते.
भारतीय दूतावास आणि तेथील कर्मचाऱयांच्या सुरक्षेबद्दल ब्रिटन सरकारचा निष्काळजीपणा कुठल्याही स्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले होते. विदेश मंत्रालयाकडून ब्रिटन सरकारला व्हिएन्ना कराराच्या अंतर्गत पार पाडाव्या लागणाऱया कर्तव्यांची आठवण करून देण्यात आली होती.









