वार्ताहर /किणये
मराठा लाईट इन्फंट्री, ग्रामपंचायत व न्यू इंग्लिश हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने बिजगर्णी हायस्कूल येथे शनिवारी ‘माझी माती माझा देश’ हे अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभेदार हरिश्चंद्र शिंदे हे होते. यावेळी अमृत रोपवाटिके अंतर्गत देशी झाडांची लागवड व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सोहळ्यानिमित्त ‘माझी माती माझा देश’ अभियानाला आज 12 ऑगस्ट पासून, सुरुवात करण्यात आली आहे.
ग्रा.पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर, ग्रामस्थ कमिटी चेअरमन वसंत अष्टेकर, सुभेदार आनंद नार्वेकर, लक्ष्मीकांत गौंडाडकर, विक्रांत भोसले, नायक भुसारेसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे. तसेच लावलेली झाडे जगवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे सुभेदार शिंदे यांनी सांगितले.
गावातील माजी सैनिक मधू भास्कळ, सुरेश भास्कळ, तानाजी भास्कळ, शिवाजी मोटर, परशराम भास्कळ, जोतिबा भास्कळ यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ ही घोषवाक्ये म्हणण्यात आली. या अभियानाअंतर्गत विविध प्रकारच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावेळी ग्रा. पं. सदस्यांसह विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.









