वार्ताहर/मजगाव
उद्यमबाग पोलीस स्टेशनतर्फे शनिवार दि. 17 रोजी सुख-शांती कार्यालय, खानापूर रोड, ब्रह्मनगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सीपीआय पाटील होते. यावेळी मजगाव व उपनगरातील सर्व गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मजगावचे प्रमुख पंच, पीएसआय व इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी विसर्जन व्यवस्था कळीचा मुद्दा ठरला. मजगाव देवस्थान पंच कमिटीचे प्रमुख पंच शिवाजी पट्टण यांनी श्री ब्रह्मदेव मंदिरासमोरील तलावात गणेश विसर्जनास कडाडून विरोध केला.
गणेश विसर्जन करण्यास नागरिकांचा विरोध
तलाव पूर्ण रिकामी झाल्याने गावामार्फत वैयक्तिक निधीतून सुमारे 2 लाख रुपये खर्चून तलावातील गाळ काढून सुमारे 5 फूट तलावाची खोली वाढविली आहे. तलावात कुठलेही दूषित पाणी येणार नाही याची काळजी घेतली आहे. सदर तलावाचे पाणी जनावरांना पिण्यासाठी आम्ही वापर करणार आहोत. कृपया परिसरातील गणेश विसर्जनासाठी पर्यायी जागा शोधावी. आम्ही ग्रामस्थ यावर्षी तलावात गणेश विसर्जन करू देणार नसल्याचे प्रशासनाला सांगितले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर्षी पुन्हा एकवेळ विसर्जनाची मुभा द्यावी. पुढील वर्षी आपण व्यवस्था करू, असे सांगत होते. पण ग्रामस्थांनी याला कडाडून विरोध केला आहे. यावेळी परिसरातील गणेशोत्सव पदाधिकाऱ्यांनी आपापल्या समस्या मांडल्या.चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. परिसरातील सर्व मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.









