शिष्टाचार समितीने आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचा आरोप, विरोधी खासदारांचा बैठकत्याग
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
संसदेच्या शिष्टाचार समितीच्या बैठकीत गुरुवारी गदारोळ झाला. ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात चौकशीसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही सभात्याग केला. खासदार मोईत्रा यांना आक्षेपार्ह आणि खासगी स्वरुपाचे वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आल्याने त्यांनी सभात्याग केल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. मात्र, यावर चुकीचे आरोप करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. तर, शिष्टाचार समितीसमोर महुआ मोईत्रा यांनी तपासात सहकार्य केले नाही, असे स्पष्टीकरण समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी दिले आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्नांच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. लोकसभेची शिष्टाचार समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे. गुऊवारी समितीसमोर चौकशीसाठी हजर झालेल्या महुआ मोईत्रा यांनी आपल्याला चौकशीदरम्यान आक्षेपार्ह आणि अत्यंत वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप केला. महुआ मोईत्रा यांच्यासह इतर विरोधी सदस्यांनीही वैयक्तिक प्रश्नांच्या निषेधार्थ बैठकीवर बहिष्कार टाकला. समितीच्या प्रश्नांना विरोध करत महुआसह विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. विरोधी पक्षांच्या खासदारांनी या बैठकीच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. कथित पॅश फॉर क्वेरी प्रकरणात त्यांच्याविऊद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. दुपारच्या जेवणानंतर उलटतपासणी सुरू असताना एकच गोंधळ उडाला होता.
वैयक्तिक आणि अनैतिक प्रश्नांची विचारणा
लोकसभा शिष्टाचार समितीच्या बैठकीत पॅनेलचे प्रमुख विनोद कुमार सोनकर यांनी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांना वैयक्तिक, अनैतिक प्रश्न विचारल्याचा गंभीर आरोप झाला आहे. तुम्ही किती वाजता भेटलात, कधी कोणाशी बोललात, हॉटेलमध्ये कोणाला भेटलात, रात्री कुणाशी बोललात असे प्रश्न महुआ मोईत्रा यांना विचारण्यात आल्याचे विरोधी सदस्यांनी सांगितले. त्यानंतर समितीची बैठक अर्धवट सोडून विरोधी पक्षाचे खासदार संतापाने बाहेर पडले. ते भाजपवर टीका करत होते. लगबगीने निघालेल्या महुआ मोईत्राही चांगल्याच चिडलेल्या दिसून आल्या. पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी ‘ही कसली बैठक होती? ते सर्व प्रकारचे घाणेरडे प्रश्न विचारत आहेत.’ असे मोईत्रा म्हणाल्या. विरोधी सदस्य आणि महुआ मोईत्रा यांच्या गदारोळानंतरही शिष्टाचार समितीने चर्चा सुरू ठेवली.
पैसे घेतल्याचे आरोप निराधार
संसदीय समितीसमोर हजर होण्यापूर्वी तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांनी लाचखोरीचे आरोप ठामपणे फेटाळून लावले. वकील जय अनंत देहादराय हे वैमनस्यातून संसदेत प्रश्नांच्या बदल्यात पैसे घेतल्याचा बिनबुडाचा आरोप करत आहेत, असे स्पष्ट केले. गुऊवारी महुआ यांनी आपण निर्दोष असल्याची बाजू शिष्टाचार समितीसमोर मांडली. आपल्यावर झालेले आरोप देहादरायविरुद्धच्या शत्रुत्वामुळे प्रेरित असल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेस, बसपा खासदारांचा मोईत्रांना पाठिंबा
बैठकीत महुआ मोईत्रा यांना तेलंगणा काँग्रेसचे एन उत्तम कुमार रे•ाr आणि बहुजन समाज पक्षाचे दानिश अली यांच्यासह काही विरोधी खासदारांचा पाठिंबा मिळाला. तथापि, मध्यप्रदेश भाजपचे प्रमुख आणि खासदार व्ही. डी. शर्मा यांच्यासह काही भाजप सदस्यांना महुआने आरोपांच्या मुख्य भागाचे उत्तर द्यावे अशी इच्छा होती. वकील देहादराय यांच्या याचिकेचा हवाला देत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआविऊद्ध लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. बिर्ला यांनी हे प्रकरण शिष्टाचार समितीकडे पाठवले आहे. महुआ यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून लोकसभेत प्रश्न विचारल्याचे भाजप खासदाराचे म्हणणे आहे.









