जत, प्रतिनिधी
Sangli News : जत तालुक्यातील माडग्याळसह सात गावांच्या पाण्यासाठी खासदारांसह प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून म्हैसाळचे पाणी देण्याची तयारी सुरू केली असतानाच, वन विभागाने कुणाच्या राजकीय दबावाखाली काम थांबवले असा सवाल जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी उपस्थित करत त्यांनी वन विभागावर प्रचंड संताप व्यक्त केला.
जमदाडे म्हणाले, अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला येथील पाण्याचा प्रश्न सुटला असताना राजकीय श्रेय वादातून वनविभागाच्या माध्यमातून चांगल काम थांबिवले आहे.याचा आम्ही शेतकरी बांधव जाहीर निषेध करतो.या कामासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी माजी आमदार जगताप साहेब व माझ्या पाठपुराव्यानंतर खास बाब म्हणून खासदार फंडातून डिझेल साठी १२ लाख रु.मंजूर केले.यांत्रिकी विभागाच्या मशिनरी घेऊन काम पूर्ण करून ८ दिवसात माडग्याळ ओढ्यात पाणी सोडणेसाठी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी यांचे समवेत बैठक घेऊन काम गुरूवारी चालू केले होते.परंतु या चांगल्या कामाला खोडा घालण्यात आला आहे.
शुक्रवारी अचानक वनविभागाचे अधिकारी यांनी माडग्याळ येथे जावून काम बंद केले आहे.जत तालुक्यात भयाण दुष्काळ असताना शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभे राहण्याची व कांही ठिकाणी लवचीक भूमिका स्वीकारण्याची गरज असते,परंतु तसे घडले नाही.वास्तविक पहाता वनविभागात किती भ्रष्ट कारभार आहे हे सगळ्यांना माहीत आहे. दररोज १० ट्रक लाकूड जत मधून सांगली इचलकरंजीला जाते.जलसंधारणातून खड्डे आणि चारी किती काढल्या ते कामे कोणी केली,किती रोपे लावली,किती जगली,वणक्षेत्र राखण करणेसाठी मजूर कोण लावताय त्यांना किती पगार देतात हे सगळं या विभागाचे गौडबंगाल आहे. या खात्यात मोठ्या प्रमाणात कुणाच्या आशिर्वादाने भ्रष्टाचार सुरू आहे,हे जग जाहीर आहे. याच भ्रष्टाचारावर पांघरूण घालून चांगल्या कामाला खिळ घालने हे निंदनीय आहे.अशा शब्दात प्रकाशराव जमदाडे यांनी संताप व्यक्त केला.








