राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बंडखोर नेते अजित पवार हे जर एकमेकांना भेटून आपली नाती जपत असतील तर कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी पक्षाच्य़ा विचारधारेवरून एकमेकांशी कशासाठी भांडाय़चे असा सवाल करून अशाप्रकारचा ‘ढोंगीपणा’ शिवसेनेच्या डीएनएमध्ये नसल्याचा टोला संजय राऊत यांनी शऱद पवारांना लगावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित यांची पुण्यात भेट झाली त्या पार्श्वभुमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ही टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर भेट घेतली आणि शरद पवार आणि अजित यांच्यातील शनिवारची भेट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या वातावरणावर चर्चा झाली. त्यांनी महाविकास आघाडीच्या युतीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचीही चर्चा केली आहे.” असा खुलासा त्यांनी केला.
या भेटीनंतर प्रत्येकाने आपापले संबंध संवादाने जपले पाहिजेत. पुतण्याने काकांना भेटले तर ते चुकीचे नाही असे मत रोहीत पवार यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या या विधानावरही संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी शरद पवार आणि रोहित पवार यांच्या बैठकीबद्दलच्या प्रतिक्रिया पाहिल्या. शरद पवार म्हणाले, अजित पुतण्या असल्याने त्यांची भेट झाली. होय…अजित पवार त्यांचाच पुतण्या आहे. रोहित पवार म्हणाले, संबंध जपावे लागतात. पण आता प्रश्न असा आहे की, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढत राहायचे? विचारधारेसाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय संदेश देत आहात? जर नेते आपले संबंध जपत असतील तर कार्यकर्त्यांना विचारधारेसाठी रस्त्यावर का लढायचे? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
राष्ट्रवादीवर परखडपणे टिका करताना ते पुढे म्हणाले, “उद्या जर आपण एकनाथ शिंदे किंवा भाजपसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांशी चहापान करायला लागलो तर रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या आणि गोळ्या खाणाऱ्या कार्यक्रर्त्यांना कोणता संदेश देणार आहात ? असा ढोंगीपणा शिवसेनेच्या डीएनएमध्ये नाही. पण राष्ट्रवादीचा डीएनए वेगळा असू शकतो”असे राऊत यांनी म्हटले आहे.









