पूर्वीप्रमाणेच सर्व कायदे निरंतर ठेवण्याचे श्रीराम सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : गोहत्या बंदी कायदा मागे घेण्याचे काँग्रेसने जाहीर केले आहे. याचबरोबर धर्मांतर बंदी कायदाही मागे घेतला आहे. याचबरोबर पाठ्यापुस्तकातील विविध राष्ट्रप्रेमींची नावे त्यामधून गाळण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्याला आमचा तीव्र विरोध असून, पूर्वीप्रमाणेच सर्व कायदे निरंतर ठेवावेत, अशी मागणी श्रीराम सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गोहत्या बंदी कायदा मागे घेतल्यास पशुंचा मोठ्या प्रमाणात बळी दिला जाणार आहे. मोकाटपणे पशुंची तस्करी करून त्यांची हत्या केली जाणार आहे. त्यामुळे पृथ्वीवरील समतोल बिघडू शकतो. तेव्हा पशुहत्या बंदी कायदा कायम ठेवावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. धर्मांतर बंदी कायदा मागे घेतल्यामुळे आता आमिषे दाखवून गरिबांना इतर धर्मांमध्ये सामावून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेही सामाजिक समतोल बिघडण्याची शक्यता असून धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
महान पुरुषांचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळू नये
पाठ्यापुस्तकांमध्ये देशभक्त, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारकांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, हा उल्लेख आणि त्यांचे कार्य गाळण्याचा प्रयत्न काँग्रेस सरकार करत आहे. त्यामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा हा अपमान आहे. तेव्हा कोणत्याही प्रकारे महान पुरुषांचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळू नये, असे या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी रविकुमार कोकितकर, विनय अंग्रोळी, विठ्ठल ग•ाr, विनोद हंगिरगेकर, गौतम भडांगे, संतोष जाधव, ओमकार गोडसे, अक्षय तरवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









