पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे संतिबस्तवाडवासीयांना आवाहन
बेळगाव : संतिबस्तवाड येथे घडलेल्या धर्मग्रंथ जळीत कांडाची सीआयडी चौकशी सुरू आहे. चौकशीत जे गुन्हेगार आढळतील, त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. यापुढे गावात जातीय सलोखा टिकून राहिला पाहिजे. असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मंगळवारी केले. संतिबस्तवाड येथील ग्राम पंचायतीबाहेर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी गावकऱ्यांना भावनिक साद दिली. हे गाव हिंदू-मुस्लीम सलोख्याचे वातावरण टिकवून ठेवणारे गाव आहे. एक-दोन समाजकंटकांमुळे गावात दुफळी निर्माण झाली. असा प्रकार पुन्हा घडू नये, असे सांगतानाच निष्पापांना त्रास होणार नाही, याची ग्वाहीही पोलीस आयुक्तांनी दिली.
गावात पुन्हा एकीचे दर्शन घडवा
सोशल मीडियावर झपाट्याने घटना जगभरात पोहोचतात. गावात आम्ही रोज एकमेकांचे चेहरा पाहणारे, एकमेकांच्या सणात सहभाग घेणारे, एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील असे वातावरण तयार करण्यात आले. यामागे कोणाचा हात आहे? हे चौकशीत सामोरे येणार आहे. जुन्या आठवणी विसरून गावात पुन्हा एकीचे दर्शन घडवावे. तुमच्या मुलांना चांगले शिक्षण द्या, डॉक्टर, आयएएस, आयपीएस बनवा, असा सल्लाही पोलीस आयुक्तांनी गावकऱ्यांना दिला.
शांतता नांदेल, यासाठी प्रयत्न करणे माझे कर्तव्य
गावातील कोणत्याही समस्या असल्या तरी थेट आपल्याशी संपर्क साधा. आपण पोलीस आयुक्त असलो तरी जनसेवक आहोत. सर्वत्र शांतता नांदेल, यासाठी प्रयत्न करणे माझे कर्तव्य आहे. ते मी करणारच आहे. गावकऱ्यांनी समाजकंटकांच्या षड्यंत्राला बळी न पडता एकोपा कायम ठेवावा. हिंदू-मुस्लीम सलोख्याच्या वातावरणाला धक्का पोहोचू नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
नूतन पोलीस आयुक्तांचा सत्कार
यावेळी बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम., पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर, अॅड. प्रसाद सडेकर, ग्राम पंचायत अध्यक्ष लक्ष्मी चन्नीकुप्पी, उपाध्यक्ष मलपुरी जेड्डीमनी, अजय चन्नीकुप्पी, बसाप्पा बिरमुट्टी, निशा जंगळी, रेणुका खानापुरी, विठ्ठल अंकलगी, शांता कर्लेकर, सातोली गुरव, भरमा गुडूमकेरी, ओमाण्णा बस्तवाडकर, रामा पाटील, एम. जी. ताशिलदार, रमजान चौधरी, अंतोन जेकब, जॉन फर्नांडिस, अॅड. पवन नाईकसह गावकरी उपस्थित होते. गावकऱ्यांतर्फे नूतन पोलीस आयुक्तांचा सत्कार करण्यात आला.









