पणजी : पंजाब येथील विष्णोई टोळीच्या मुख्य सूत्रधाराला म्हापसा पोलिसांनी गोव्यात अटक केली. विष्णोई टोळीचा मुख्य सूत्रधार गोव्यात लपून बसला असून एका खून प्रकरणात तो पंजाब पोलिसांना हवा आहे, अशी माहिती पंजाब पोलिसांनी उत्तर गोवा अधीक्षकांना मंगळवार दि. 26 ऑगस्ट रोजी दिली होती. त्यानुसार गोवा पोलिसांनी कारवाई करून संशयिताला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव विष्णू विष्णोई संग्राम रामजी (32 सुरता नगर, खुडाला, ताल-लोणी, जिल्हा- जोधपूर, राजस्थान) असे आहे. संशयिताविरोधात पंजाब राज्य गुन्हे पोलिस स्थानकात सशस्त्र कायद्यांतर्गत तसेच एका खून प्रकरणात सहभाग असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद आहे.
त्यानुसार, राहुल गुप्ता (आयपीएस यांच्या निर्देशानुसार आणि वर्षा शर्मा आयपीएस, डीआयजी रेंज यांच्या देखरेखीखाली) म्हापसा उपविभागाच्या 20 कर्मचाऱ्यांची एक विशेष टीम तयार करण्यात आली. त्यांनी जलदगतीने कारवाई केली आणि संशयित विष्णू विष्णोई तसेच इतर सहा मित्रांसह हणजूण येथील एका हॉटेलमध्ये लपून बसलेला शोधून काढला. पोलिस पथकाचे नेतृत्व निरीक्षक निखिल पालेकर (म्हापसा पोलिस स्थानक) आणि उपनिरीक्षक स्वप्नील नाईक (हणजूण पोलिस स्थानक) यांनी केले. संशयित विष्णू विष्णोई याला पंजाब राज्य गुन्हे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तर इतर सहा जणांना वरील गुह्यात सहभागी नसल्याचे आढळून आल्याने अटक करण्यात आली नाही.








