आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झाला होता हल्ला
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये 19 सप्टेंबर रोजी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुप्तचर विभागाकडून प्राप्त माहितीच्या आधारे इंफाळ पश्चिम व विष्णुपूर जिल्हा पोलीस, 33 आसाम रायफल्स आणि इतर सुरक्षा दलांनी बुधवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास कामेंग परिसरात एक विशेष मोहीम राबवून मुख्य आरोपीला गजाआड केले. या कारवाईदरम्यान 47 वर्षीय खोमद्रम ओजित सिंग उर्फ केलाल याला अटक करण्यात आली. त्याच्या घरातून हल्ल्यात वापरलेली मोठ्या प्रमाणात शस्त्रs आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. पोलीस चौकशीदरम्यान त्याने जामिनावर सुटलेला पीएलए सदस्य असल्याचे आणि 19 सप्टेंबरच्या हल्ल्यात थेट सहभागी असल्याचे कबूल केले. मणिपूरचे पोलीस महासंचालक राजीव सिंह यांनी बुधवारी यासंबंधीची माहिती दिली.
मणिपूरमध्ये मागील आठवड्यात आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान हुतात्मा झाले होते. तसेच अन्य पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. आसाम रायफल्सच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर मुख्य आरोपी साथीदारांसह फरार झाला होता. त्यानंतर त्याने आपली शस्त्रs आणि दारूगोळा एका गुप्त ठिकाणी लपवून ठेवला होता असे पोलिसांनी सांगितले. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.









