वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘कॅश फॉर क्वेरी’च्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होत आहे. याप्रकरणी त्यांना गुऊवार, 2 नोव्हेंबर रोजी लोकसभेच्या शिष्टाचार समितीसमोर हजर राहायचे आहे. या चौकशीपूर्वी महुआ यांच्या संसद खात्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार महुआ मोईत्रा यांचे लोकसभा खाते दुबईतून 47 वेळा लॉग इन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी लाच घेतल्याचा आणि आपले लोकसभा खाते (लॉग इन आयडी आणि पासवर्ड) व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्यासोबत शेअर केल्याचा आरोप केला होता. महुआंनी हिरानंदानीकडून सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी आणि लॉग इन आयडी शेअर करण्याच्या बदल्यात मोठी लाच आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचा दुबे यांचा आरोप होता. या आरोपानंतर खासदार महुआ मोईत्रा यांनी आपण लॉग-इन व्रेडेन्शियल्स हिरानंदानीसोबत शेअर केल्याचे कबूल केले आहे. मात्र यासाठी पैसे मिळाल्याचे त्यांनी नाकारले आहे.









