अलखनूर येथील घटना
वार्ताहर/कुडची
माहुताला हत्तीने पायात तुडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अलखनूर (ता. रायबाग) येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. करेप्पा सखराम बेवनूर (वय 28), मूळ रा. भरमकोडी, ता. अथणी, सध्या रा. अलखनूर असे हत्तीच्या हल्ल्यात मृत झालेल्या साहाय्यक माहुताचे नाव आहे. याबाबत हारूगेरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अलखनूर येथील देवस्थानात सेवेसाठी हत्ती आहे. या हत्तीची देखभाल करण्यासाठी एक माहुत व एक साहाय्यक आहेत. सोमवारी सकाळी साहाय्यक माहुत करेप्पा हा हत्तीला वैरण टाकण्यासाठी गेला असता त्याच्यावर हल्ला करून हत्तीने त्याला ठार केले. वैरण टाकून परत न आल्याने काहीवेळाने तेथे असलेल्यांनी जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. याची माहिती मंदिर समितीला समजताच त्यांनी पोलिसांना व वन खात्याला माहिती देण्यात आली. हा हत्ती देवस्थानासाठी म्हणून सेवेत घेतला असून त्यासंबंधी सर्व प्रक्रिया रितसर आहे. देवस्थान समितीकडून हत्तीसाठी वनखात्याकडून संमती व त्याबाबत विमा व इतर प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच वन खात्याने हत्तीची तपासणी केली आहे.









