प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावमधील मराठी माध्यमातील मुलींची अग्रेसर शाळा म्हणून महिला विद्यालयाचे नाव घेतले जाते. या शाळेचा शतकमहोत्सव दि. 27 व 28 रोजी महात्मा गांधी भवन येथे होणार आहे. यानिमित्त….
कोणतीही व्यक्ती किंवा एखादी संस्था उत्तुंग शिखरावर पोहोचण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा हातभार पुरेसा नसून ती संस्था मानाने उभी राहण्यासाठी शाळेच्या विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थेचे पदाधिकारी, देणगीदार, हितचिंतक, शिक्षणप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते यांचे परिश्रम कारणीभूत ठरतात. स्त्राr शिक्षणाचा उत्तुंग वसा महाराष्ट्रभर पसरविणारे भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या प्रेरणेने त्यांच्या परिश्रमाचा वारसा पुढे नेणाऱ्या कष्टाळू, शिस्तप्रिय, शाळेच्या आद्य संचालिका कै. बनुबाई अहो यांच्या साथीने महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी 25 मे 1923 रोजी प्रसिद्ध वकील कै. दत्तोपंत बेळवी यांच्या साथीने महिला विद्यालय मंडळाची स्थापना केली. 27 मे 1923 रोजी महिला विद्यालय हायस्कूलची सुरुवात करून स्त्राr शिक्षणाची बेळगावात मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी मुलींना शाळेत पाठविणे म्हणजे धाडसच होते. परंतु कुमारी गोदावरी बेळवी, इंदु मुजुमदार व गोदावरी खोत या तीन मुलींना घेऊन बनुबाई अहो यांनी शाळा सुरू केली. स्वत: अण्णासाहेब कर्वे यांनी शाळेत पहिला तास घेतला. या ऐतिहासिक घटनेची नोंद आज या शतक महोत्सवात करणे योग्यच ठरेल. कारण शतक महोत्सव साजरा करताना पहिल्या पावलाची आठवण आपल्याला सुवर्णक्षणाकडे घेऊन जाते. काळानुरुप येणाऱ्या अनेक संकटांना सामोरे जात शतकाची ही पहाट उगवली. त्यात शुक्रतारा असलेली आमची शाळा सुरुवातीला सोशल क्लब, त्यानंतर क्रीडा भवन, अतिथी गृहृ, सुंठणकर वाडा अशी स्थलांतरीत करत बेळगाव शहराच्या मध्यस्थानी म्हणजेच कॉलेज रोडवर मोठ्या दिमाखात उभी आहे. इयत्ता सहावी ते दहावी अनुदानित असलेली ही शाळा कोरोना, लॉकडाऊन त्याचप्रमाणे पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे असणारा कल आणि कन्नड भाषेचे वाढते प्रस्थ या आव्हानांना पेलून आज मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्याच्या स्पर्धेत 400 विद्यार्थिनींसह उत्तम वाटचाल करत आहे. शाळेची दिमाखदार व ऐतिहासिक इमारत, भव्य पटांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, इंटरनेटयुक्त संगणक कक्ष, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, शाळेतील विविध वैशिष्ट्यापूर्ण शैक्षणिक सुविधांमुळे परिसरातील विद्यार्थिनी व पालकांचा शाळेप्रती विश्वास वाढलेला दिसून येत आहे. या शैक्षणिक वाटचालीत व विकासात महिला विद्यालय मंडळाचा मोलाचा अमूल्य वाटा आहे. या शाळेत शहराबरोबरच खेड्यांतून मुली शिक्षण घेण्यासाठी येतात. शाळेचा एसएसएलसी निकाल दरवर्षी चांगला लागत असून कर्नाटक एसएसएलसी बोर्डाकडून शाळेला सरासरी ए श्रेणी मिळाली आहे, ही अत्यंत गौरवाची बाब आहे.
विविध ठिकाणी होणाऱ्या आंतरशालेय स्पर्धेत आमच्या शाळेतील मुली हिरीरीने भाग घेतात. विज्ञान प्रदर्शन, क्रीडा, प्रश्नमंजुषा, चित्रकला, वक्तृत्व, गायन स्पर्धांमध्येही शाळेतील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक द्विगुणीत केला आहे. शाळेच्या माजी विद्यार्थिनींची परंपरा पाहिल्यास यशाचा दरवळ पसरलेला दिसून येतो. प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारी विद्यार्थिनींची परंपरा शाळेला लाभली आहे. भारतातील टेस्टट्युब बेबी तयार करणाऱ्या पद्मश्री डॉ. इंदिरा हिंदुजा, मराठी साहित्यातील नामवंत कवयित्री इंदिरा संत, वैमानिक गीता गोडबोले, मराठी अभिनेत्री उषा नाईक इत्यादी. जिल्हाधिकारी असलेल्या मौसमी चौगुले तसेच प्राध्यापिका, वकील, उद्योजिका, सीए, समाजसेविका, गायिका, नृत्यांगना तसेच उच्चशिक्षण क्षेत्रात प्राचार्य वगैरे उच्च पदांवर अनेक विद्यार्थिनी विराजमान आहेत.
महिला विद्यालय हायस्कूलचा अमृतमहोत्सव दि. 8 व 9 जानेवारी 2000 रोजी डॉ. अशोक साठे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. द. ना. धनागरे व प्रा. देवदत्त दाभोळकर, माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ, या व्यतिरिक्त प्रा. लीला पाटील, सुमित्रा भावे, मीरा भागवत, चेअरमन न. श्री. फडके, कार्यवाह प्रभाकर बिच्चु, प्रभारी मुख्याध्यापक एस. बी. नाईक व इतर शिक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अमृतधारा स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. द. ना. धनागरे यांच्या हस्ते करण्यात आले. आता शतकमहोत्सवी सोहळा आयोजित करताना व्यवस्थापन मंडळाला विशेष आनंद होत असून दोन्ही दिवस भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. शतक महोत्सवाचा सोहळा यशस्वी व बहारदार क्हावा याकरिता आयोजिलेल्या सर्व उपक्रमांसाठी आजी-माजी विद्यार्थिनी, सामाजिक संस्था, शिक्षणप्रेमी यांचे साहाय्य मोलाचे ठरणार आहे.









