इम्रान मकानदार,कागल प्रतिनिधी
एसटी महामंडळाच्या वातानुकुलीतसह सर्व बसेमधून महिलांना प्रवासात अर्धे तिकीट आकारण्यात येत आहे.यामुळे एसटीची प्रवासी संख्या वाढण्यास मदत झाली आहे.त्यामुळे एसटीच्या एकूण उत्पन्नात वाढ होत आहे.कागल आगाराचे उत्पन्न वाढण्यास यामुळे मदत झाली आहे.यापूर्वी कागल आगाराला दिवसा सहा ते साडेसहा लाख रुपये उत्पन्न मिळत होते.मात्र महिलांना अर्धे तिकीट जाहीर झाल्यापासून हेच उत्पन्न दिवसाला ९ लाखाच्या आसपास पोहोचले आहे.
या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. १७ एप्रिल रोजी राज्य शासनाचा हा निर्णय जाहीर झाल्यानंतर गेल्या अडीच महिन्यात ८ लाख ५६ हजार ६० महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे.त्यातून कागल आगाराला १ कोटी ४० लाख ५३ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.तेवढीच रक्कम शासनाकडून प्रतिपूर्ती रक्कम म्हणून महामंडळाला मिळणार आहे.त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीसाठी ही योजना संजीवनीच ठरणार आहे.
महिला सन्मान योजना राज्य शासनाने जाहीर केली.एप्रिल महिन्यात पंधरा दिवसात १ लाख १८ हजार महिलांनी प्रवास केला.यामधून आगाराला २० लाख ६५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मे महिन्यात ३ लाख ७१ हजार महिलांनी प्रवास केला यातून ६५ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर जून महिन्यात ३ लाख ६७ हजार महिलांनी एसटीतून प्रवास केला.यातून ५३ लाख ९८हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.या योजनेपूर्वी कागल आगाराचे दिवसाचे उत्पन्न सहा ते साडेसहा लाख रुपये इतके होते. या महिला सन्मान योजनेमुळे सध्या दररोज सरासरी ९ लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे.यापूर्वी ९२ बसेस कागल आगाराच्या धावत होत्या यातून सहा ते साडेसहा लाख रुपये उत्पन्न मिळत होते. आता ५९ बसेस धावतात व उत्पन्न ९ लाखावर मिळू लागले आहे. त्यामुळे कागल आगार फायद्यात आले आहे.
नवीन बसेसची गरज …
महिला सन्मान योजनेमुळे महिला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.मात्र अपुऱ्या व नादुरुस्त बसेसमुळे एसटीच्या कांही फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत.जिल्ह्यातील काही आगारांना नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत.मात्र कागल आगाराला अजून एकही नवीन बस मिळालेली नाही.लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन आगाराला नवीन बसेस मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत.
वॉटर हार्वेस्टिंगचा उपयोग होतो.








