कणकवली / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष व कणकवली शहरातील प्रतिष्ठित व्यापारी महेश चंद्रकांत नार्वेकर (४५) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. गुरुवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन घरी गेले होते. शुक्रवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. कणकवली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांचे ते भाऊ होत. शहराच्या सामाजिक चळवळीत त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असे. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात कणकवलीतील विविध स्तरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली.









