‘लोकमान्य’च्या ‘स्वर संध्या’ला उदंड प्रतिसाद

मडगाव : पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व नवीन पिढीच्या भारतीय शास्त्रीय संगीताचा चेहरा म्हणून ज्यांनी स्वत: ला स्थापित केले आहे. त्या महेश काळे यांनी काल शुक्रवारी मडगावच्या रवींद्र भवनात ‘स्वर संध्या’ या संगीत मैफलीत श्रोत्यांवर अक्षरशा स्वराची बरसात करत त्यांना चिंब भिजविले. गोव्याकडून आपल्याला भरपूर प्रेम मिळत आलेलं आहे. हे भाग्यच काम आहे. आपण सुरवातीला जसं आपण कुठल्याही कार्यसंपन्न करण्याच्या आधी आई-वडिल धाऱ्यांचे पाया पडतो आणि मग पुढे कार्यक्रम सिद्धीस नको तसं आमच अभिज्यात संगीत-शास्त्रीय संगीत त्याच्या पायापडून पुढे नाट्यासंगीत-अभंग जे श्रोत्यांना हवंय ते आपण सादर करू असे सांगत महेश काळेनी ‘कुरूया कल्याण’ या रागामधील दोन बंदिशीनी आपल्या मैफलीची सुरवात केली. आम्ही जेव्हा रियाझला बसतो तेव्हा तीन चार रागाचा रियाझ करतो. त्यात पहाटेचा एक, सकाळचा एक, दुपारचा आणि संध्याकाळचा एक. त्यामुळे रागाच्या जवळ राहिल्याने आईच्या जवळ राहिल्याचे जे सुख असते ते मिळतं आणि एकदा आईचा आशीर्वाद मिळाला की, जगात कुठे ही गेल्या तरी आत्मविश्वास वाढतो तसंच वाटत असं सांगत त्यांनी संगीत ‘मत्स्यगंधा’ नाटकातील रामदास कामत यांनी गायिलेले ‘प्रेम वरदान, स्मर सदा हे नाट्यागीत सादर केले. गोव्यात आल्यानंतर येथील देव मंडळी आपल्याला जाणवते, पं. जितेंद्र अभिषेकी, रामदास कामत यांच्या मातीतील आपण सर्व जण आहोत म्हणत त्यांनी रामदास कामत यांनी गायिलेलं आणि पं. जितेंद्र अभिषेकी संगीतबद्द केलेलं संगीत मत्स्यगंधा नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमानेम, कुणी रखडती धुळीत आणि कुणास लाभे हेम’ हे गाजलेले नाट्यागीत सादर केलं. या नाट्यागीताला श्रोत्यांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला. मध्यतरांच्या पूर्वी त्यांनी तरूण मंडळीला जोडण्यासाठी एक प्रयोग करताना गीतकार मंगेश पाडगावकर, संगीतकार पु. ल. देशपांडे व गायक कलाकार पं. जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेलं गाण ‘शब्दावाचून कळले सारे शब्दाचे पलिकडले, प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले’ गाणे सादर केले. हे गाणे त्यांनी उपस्थितीत श्रोत्यांना आपल्या सोबत सादर करण्यास भाग पाडलं. त्यात रोझा चित्रपटाचे सुरेख मिश्रण करून तरूणांना जोडलं.
मध्यतरांच्या नंतर पुन्हा मैफल सजविताना त्यांनी बाकिबाब बोरकर यांचे ‘त्या दिसा वडा कडेन गडद तिनसना, मंद मंद वाजत आयली तुजी गो पांयजणा’ हे कोकणी गाणे सादर केले. त्याला जोडून त्यांनी यतीन तळावलीकर यांनी संगीत साज चढविलेली एक कोकणी भक्तीरचना सादर केली. श्रोत्यांनी दोन्ही गाण्यांना दाद दिली. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘घेई छंद मकरंद’ हे नाट्यागीत त्यांनी श्रोत्यांकडून सादर करून घेण्याचा एक सुरेख प्रयत्न केला. त्यानंतर तुकाराम महाराजाचा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता हा अभंग सादर केला. आपल्या सुरेख मैफलीची सांगता त्यांनी ‘कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा’ या अभंगाने केली. कार्यक्रमाला लोकमान्य मल्टिपर्पजचे संचालक अजित गरगट्टी, गजानन धामणेकर, पंढरी परब, विठ्ठल प्रभू, अभिजीत दिक्षित तसेच सई ठाकूर बिजलानी यांनी संगीत साथ करणार कलाकार हार्मोनियम वादक राया कोरगांवकर, तबलापटू मयांक बेडेकर, संवादिनी वादक महेश धामस्कर, पखवाजपटू किशोर तिळवी, मंजिरी साथ करणारे राहुल खांडोळकर, तानपुरा साथ करणाऱ्या सिद्धी शेलार मळीक व श्रद्धा केरकर तसेच स्वर साथ देणारे चैतन्य पाठक यांना सन्मानीत केले. यावेळी महेश काळे यांचाही सत्कार करण्यात आला.









