राजकीय स्थिती पाहता यावेळची लढत बहुतांश ठिकाणी एकास एक होण्याची शक्यता
By : संजय खूळ
इचलकरंजी : सहकाराच्या माध्यमातून विशेषतः सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्यात प्रत्येक गावात एका विशिष्ट गटाचे अस्तित्व निर्माण झाले आहे. तालुक्यात तीन सहकारी साखर कारखाने आहेत. याशिवाय जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यातही तालुक्यातील अनेक गावांना वर्षानुवर्षे प्रतिनिधित्व कायम राहिले आहे.
यातूनच गटाचे अस्तित्व गावागावात निर्माण झाले आहे. तालुक्यातील अनेक नेत्यांना जिल्ह्यातील वेगवेगळी पदे भूषविण्याचा मानही मिळाला आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून हातकणंगले तालुका ओळखला जातो. तालुक्यात पक्षापेक्षा गटाचे अस्तित्वच मोठ्या प्रमाणात आहे.
तब्बल नऊ गट या तालुक्यात पहावयास मिळतात. आवाडे गट, महाडिक गट, विनय कोरे गट, मिणचेकर गट, राजू आवळे गट, आमदार माने गद, राजू किसन आवळे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना उद्धव ठाकरे गट व खासदार माने गट अशा गटांचे कमी जास्त प्रमाणात तालुक्यात अस्तित्व कायम आहे.
यापूर्वी जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीच्या निवडणुका पक्षाऐवजी गटांवरच अधिक निर्णायक झाल्या. त्यामुळे गटाचा सभापती अथवा जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी रस्सीखेच तालुक्यात नेहमीच होत राहिली. यामागे विधानसभा निवडणुकीचे लक्ष गृहित धरून अनेकांनी किमान आपले एक-दोन तरी जिल्हा परिषद सदस्य असावेत असाच प्रयत्न सातत्याने ठेवला आहे.
वरील गटातील बहुतांशी सर्वांनी जिल्हा परिषदेचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. जिल्ह्यात राज्य पातळीवर नेत्यांच्या दौऱ्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावरच लढवण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील सद्यस्थितीत राजकीय गटाचा कल पाहता महायुतीकडे आवाडे गट, खासदार माने, महाडिक गट, विनय कोरे गट, मिणचेकर गट, आमदार माने गट, तर काँग्रेसचे राजूबाबा आवळे व शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील. या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सहभागी करून घेण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
हातकणंगले आणि हुपरी या मतदारसंघाची नावे यावेळी बदलण्याची शक्यता आहे. कारण या दोन्ही गावांमध्ये आगामी जिल्हा पारषदद्या लढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी एकास एक लढतीचे संकेत असल्यामुळे अनेक प्रभागात चुरशीच्या लढती पहावयास मिळणार आहेत.
नगर परिषद स्थापन झाल्यामुळे ही गावे त्यातून वगळली जाणार आहेत. गटाचे प्राबल्य पाहता आवाडे गटाकडून किमान चार ते पाच जिल्हा परिषद मतदारसंघावर हक्क सांगण्याची शक्यता आहे. यामध्ये रेंदाळ, पट्टणकोडोली, कबनूर, कोरोची व हुपरी या जिल्हा परिषद मतदारसंघाचा दावा होईल.
विनय कोरे गटाकडून घुणकी, भादोले व कुंभोज मतदारसंघावर दावा होण्याची शक्यता आहे. तर खासदार गटाकडून रुकडी, हेरले, प. कोडोली मतदारसंघावर आणि महाडिक गटाकडून प्रामुख्याने शिरोली आणि भादोले या मतदारसंघावर दावा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते एकत्र येऊन महाविकास आघाडी मार्फत निवडणूक लढवताना ते स्वाभिमानी शेतकरी संघटनाबरोबरच महायुतीतील नाराज घटकांना आपल्याकडे वळवून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच राजकीय स्थिती पाहता यावेळची लढत बहुतांश ठिकाणी एकास एक होण्याची शक्यता आहे. परंतु ऐनवेळी नाराजी नाट्यातून काही ठिकाणी बंडखोरी नाकारता येत नाही. मात्र यावेळची निवडणूक चुरशीची आणि लक्षवेधी होणार आहे.
जिल्ह्यातील एक सधन तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातकणंगले तालुक्यात अनेक गटांचे अस्तित्व कायम आहे. पक्षापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनेक निवडणुका या गटावरच अधिक प्रभावशाली ठरत होत्या. परंतु एकूणच राजकीय चित्र बदलल्यानंतर हातकणंगले तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच थेट लढत होणार आहे.
महायुतीकडे तब्बल सहा गट असून महाविकास आघाडीकडे दोन गटाबरोबरच आणखी एक गट समाविष्ट करून घेऊन आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी एकास एक लढतीचे संकेत असल्यामुळे अनेक प्रभागात चुरशीच्या लढती पहावयास मिळणार आहेत.








