रत्नागिरी :
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, नगर पंचायती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रितपणे महत्वपूर्ण निर्णय रत्नागिरीत घेण्यात आला आहे. लढण्याचा शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत ही रणनीती ठरली. या निर्णयाचे तंतोतंत पालन करत जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
रत्नागिरीत जयस्तंभ येथील कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषद शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांनी महायुतीच्या एकजुटीवर रणनीती ठरल्याचे सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, बंड्या साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदकर, नेते सुदेश मयेकर, विजय खेडेकर, महिला संघटक कांचन नागवेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी महायुतीच्या पूर्वीच्या यशाची आठवण करून देत महायुती म्हणून यापूर्वी लोकसभा निवडणुका लढल्या, त्यात यश मिळाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत तर सर्वात मोठा विजय महायुतीला मिळाला. एकत्रित निवडणूक लढण्याचा मोठा फायदा महायुतीला झाला असल्याचे त्यांनी सांगितले. मागील अडीच वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारने केलेल्या कामाचे कौतुक करत विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचे सरकार राज्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सर्वसामान्यांना न्याय देत सरकारला गती दिल्याचे पंडित यांनी सांगितले. एकदिलाने आणि एकसंघ काम केल्यामुळे राज्यात जसा महायुतीचा भगवा फडकला. तसाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती आणि एकत्रित लढून जिल्ह्यात पुन्हा महायुतीचा भगवा फडकवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- जागा वाटपाबाबत लवकरच वरिष्ठ नेत्यांची बैठक
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या नेत्यांची लवकरच महायुतीबाबत बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्येही युतीची एकत्रित घोषणा केली जाईल. त्याचदरम्यान, आगामी निवडणुकांसाठी जागा वाटपाचे धोरण निश्चित केले जाईल, अशी माहितीही जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- विकासकामांच्या जोरावर निवडणुकीत विजयाचा विश्वास
राज्यातील सत्तेत आल्यापासून मंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणल्याचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी सांगितले. पर्यटन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करत रत्नागिरीला शैक्षणिक हब बनवण्याच्या दिशेने त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. किती वर्षे एवढा निधी पाहिला नाही, तेवढा सामंत यांच्या रूपाने जिल्ह्यात निधी आला आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहते, असे पंडित यांनी सांगितले. त्यामुळे आगामी निवडणुका महायुती म्हणून ठाम विश्वासाने लढणार असल्याचे स्पष्ट केले.








