सर्रास डीपीवरील पेट्या निकामी; नागरिकांच्यातून संतप्त प्रतिक्रिया
सांगरूळ / वार्ताहर
महावितरणच्या गलथान कारभाराचा नागरिकांना नेहमीच फटका बसत असतो. कधी सातत्याने वीज पुरवठा खंडित होणे तर कधी अवाढव्य वाढीव बिले, वीज बिलाच्या वसुलीसाठी ग्राहकांना वेठीस धरणारे महावितरणचे अधिकारी ग्राहकांना सुरक्षित सेवा पुरवण्यासाठी मात्र बेजबाबदार असल्याचे चित्र ग्रामीण भागात सर्रास पाहायला मिळत आहे .
महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे अनेक शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागलेले आहे. गावा गावातील चौका चौकांमध्ये असणारे जुने पोल जमिनीलगत पूर्णपणे सडलेले आहेत. वीज पुरवठा करणाऱ्या तारा काही ठिकाणी जमिनीपासून कमी उंचीवर आहेत. डीपी वरील पेट्या तर पूर्णपणे सडलेल्या आहेत .पेट्यांना दरवाजे नाहीत यामुळे पेट्या पूर्णपणे उघड्यावर आहेत. मुळातच या पेट्या जमिनीपासून जवळ असल्याने धोका होण्याचा अधिक संभव असतो.
आमशी (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेजवळ लहान मुले खेळताना त्यांचा चेंडू शेजारी असणाऱ्या डीपीवरील उघड्या पेटीमध्ये जाऊन अडकला. तो चेंडू ती मुले काठीच्या साह्याने काढत होती नेमका याचवेळी तेथून जाणाऱ्या नागरिकांनी हा फोटो मोबाईल मध्ये काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आणि महावितरणच्या या गल्थान कारभाराबद्दल परिसरातील नागरिकांच्या मधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
महावितरण वसुलीत व्यस्त
ग्राहकांच्याकडून वीज बिलाची वसुली करणे या एकाच कामात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी व्यस्त असतात .त्यांना ग्राहकांना चांगली व सुरक्षित सेवा पुरवण्याबाबत कोणत्याही प्रकारचे देणे घेणे नाही . ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीने वेळोवेळी मागणी करून सुद्धा गावातील सडलेले पोल व डीपीवरील पेट्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील डीपींचा सर्वे करून खराब झालेल्या पेट्या व खराब झालेल्या वायर बदलाव्यातआणि जनतेला सुरक्षित सेवा द्यावी. अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आमशी ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणला गावातील डीपीवरील पेट्या दुरुस्त करून त्या बंदिस्त कराव्यात अशा मागणीचे निवेदन देण्यात आले असले तरी महावितरणकडून फक्त आश्वासन मिळाले आहे. असे गावच्या सरपंच पल्लवी पाटील यांनी सांगितले.