महावितरणचे अधीक्षक अभियंते विनोद पाटील यांची माहिती
वार्ताहर कुडाळ
गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा मोठा सण मानला जातो. या सणासाठी लोक बाहेरुन गावी येत असतात. गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक राहीले आहेत. गणेशोत्सव कालावधीत कुडाळ शहरासह ग्रामीण भागातील सर्व वीज समस्या तातडीने दूर करून ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी महावितरण सज्ज झाले आहे. या अनुषंगाने महावितरणचे 180 कर्मचारी अहोरात्र काम करण्यासाठी सज्ज आहेत. अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंते विनोद पाटील यांनी दिली.
श्री. पाटील म्हणाले, गणपती उत्सव 19 सप्टेंबर रोजी असला तरी आम्ही 1 ऑगस्ट पासूनच तयारीला लागलो आहोत. महावितरणकडून गणेशोत्सव कालावधीत लोकांना अविरतपणे सेवा देण्यात येणार आहेत. गणेशोत्सव कालावधीत पावसात वादळामुळे एखादा लाईटचा पोल पडला, किंवा काही वेगळी परिस्थिती उदभवली तर महावितरणचे 18 एजन्सीचे 180 कर्मचारी आपल्या तात्काळ वापरता येतील. यादृष्टीने इजन्सीला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. महावितरणकडून गावपातळीवर दोन दोन ट्रान्सफॉर्मर, फ्यूज वायर, प्लग वायर देण्यात आली आहे. मागील तीन वर्षात गणेशोत्सव काळात वीज वितरण कडून कोणताही अनुचीत प्रकार घडलेला नाही. यावर्षीही महावितरणकडून कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही. गणेशोत्सव कालावधीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांबरोबर काम करण्यासाठी गावातील लोक उत्स्फूर्तपणे स्वतः हून मदत करीत असतात. गणेशोत्सव कालावधीत लोकांना अविरतपणे लाईट सप्लाय पुरविला जाईल, अशी माहीती श्री.पाटील यांनी दिली.









