सांगली, प्रतिनिधी
Sangli News : महावितरणकडून ग्राहकांना महवितरण मोबाईल ॲप व संकेतस्थळावर ऑनलाईनव्दारे वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यातील ग्राहक ५८.३६ टक्के रक्कमेचा वीज बिल भरणा डिजिटल पध्दतीने करत आहेत. सांगली शहर विभाग ६८ टक्केसह अव्वल तर विटा विभाग ५६ टक्केसह दुसऱ्या स्थानावर आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या आदेशाने महावितरणच्या डिजीटल सेवांची जागृती केली जात आहे.सांगली जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ग्राहकांनी मासिक वीज बिलापोटी ऑगस्टमध्ये ५२ कोटी ३९ लाख रुपये ऑनलाईन पध्दतीने भरले आहेत.त्यात सांगली शहर विभागातील ७९ हजार ६०० ग्राहकांनी २२ कोटी ४८ लाख रुपये, विटा विभागात ५० हजार ५०१ ग्राहकांनी ९ कोटी २१ लाख रुपये, सांगली ग्रामीण विभागात ४६ हजार ३०१ ग्राहकांनी ८ कोटी ७७ लाख रुपये रुपये (५३.५२ टक्के), कवठेमहांकाळ विभागातील ३० हजार २७४ ग्राहकांनी ४ कोटी ९० लाख रुपये (५०.४५ टक्के), तर इस्लामपूर विभागातील ४३ हजार ६०९ ग्राहकांनी ७ कोटी ९१ लाख रुपये रुपये (४८.५५ टक्के) ऑनलाईन पध्दतीने भरले आहेत.
ऑनलाईन वीज बिल भरण्याची सुविधा निशु:ल्क (क्रेडीट कार्डव्दारे वगळून) आहे. शिवाय वीजबिलात ०.२५ टक्के सुट (रुपये ५०० पर्यंत) आहे. ग्राहकांना एसएमएस व भरणा पावती दिली जाते.ऑनलाईन वीज बिल भरण्यातील अडचणीसाठी एक स्वतंत्र मदत कक्ष महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात स्थापन केला आहे. येथे helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर तक्रारीचे निवारण केले जाते.शिवाय महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर,ॲपवर किंवा संकेतस्थळावर अधिकची माहिती व तक्रार नोंदविण्याची सोय आहे.