उचंगी प्रकल्पाचा पाणी पूजन सोहळा थाटात पार
आजरा प्रतिनिधी
राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यातील रखडलेले पाणी प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. कोरोनासारख्या महामारीचा सामना करताना महाविकास आघाडी सरकारने अनेक विकासाची कामे केली. जलसंपदा विभागातील जास्तीतजास्त निधी कोल्हापूर जिल्हय़ाला देऊन जिल्हय़ातील बहुतांशी पाणी प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. उचंगी प्रकल्पाच्या पाणी पूजन सोहळय़ाप्रसंगी ते बोलत होते.
स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी केले. या कार्यक्रमाला माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, संतोष पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री पाटील म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून उचंगीचे काम रखडले होते. या काळात जे जे लोकप्रतिनिधी झाले त्या सर्वांनीच या प्रकल्पासाठी प्रयत्न केले. त्यामुळे या प्रकल्पामध्ये स्व. सदाशिवराव मंडलिक, स्व. नरसिंगराव पाटील, स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्यासह तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर यांचेही या प्रकल्पाच्या पूर्ततेमध्ये योगदान राहीले आहे. उचंगीमध्ये पाणी अडविले असले तरी शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. गेल्या दोन-अडीच वर्षांच्या काळात माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून धरणग्रस्त संघटनांच्या प्रतिनिधींसोबत प्रशासनाच्या बैठकांचे आयोजन केले. यातून हा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाल्याचे सांगताना माजी मंत्री पाटील यांनी आमदार राजेश पाटील यांच्या पाठपुराव्याचेही कौतुक केले.
माजी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून हा प्रकल्प उभारला आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमीनी उपलब्ध होत नसल्याने आपल्याकडे काही काळासाठी जलसंपदाचे मंत्रीपद आल्यानंतर भरघोस पॅकेज देण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर राज्यातील सर्वच प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाल्याचे सांगितले. आमदार राजेश पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. अजूनही प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न शिल्लक असून शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन झाल्याखेरीज आपण व आमदार पाटील स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. तर सहकारी पाणीपुरवठा संस्था स्थापन करण्यासाठी सहकार्य करण्याची हमी दिली. यापुढे पाणी उचलण्याचे आव्हान स्विकारावे लागेल असे मतही मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
खासदार संजय मंडलिक यांनी जिल्हय़ातील प्रकल्प पूर्ण करण्यात महाविकास आघाडी सरकारचे योगदान असल्याचे सांगितले. माजी मंत्री पाटील यांनी यासाठी केलेल्या सहाकार्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले. पाण्याचा वापर शेतकऱयांनी योग्य पद्धतीने करून घेतला पाहिजे असे सांगून आता आमचे सरकार असल्याचे सांगून प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरीत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करण्याचा शब्द त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला.
कॉ. संजय तर्डेकर यांनी धरणग्रस्त आणि धरणग्रस्त संघटनांचा धरणाला कधीही विरोध नव्हता. पण आमचे पुनर्वसन झाले पाहिजे ही आमची न्याय मागणी होती. पुनर्वसनाचा कायदा काटेकोरपणे राबवावा अशी आम्ही मागणी केली होती. पण प्रशासनाने तसे केले नाही. धरणग्रस्तांच्या विरोधात केलेल्या पोलीस बळाच्या वापराबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तर धरणग्रस्तांचे उर्वरीत प्रश्न तातडीने सोडवून उचंगी धरणाला कालवे तयार करण्याची मागणी केली. कॉ. दशरथ घुरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी, धरण कृती समितीचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी प्रास्ताविकात उचंगीच्या स्थापनेपासून पूर्णत्वापर्यंतच्या वाटचालीचा प्रवास कथन केला. धरणग्रस्तांचे शिल्लक प्रश्न जानेवारीपूर्वी सोडविण्याची मागणी त्यांनी केली. तर या प्रकल्पामुळे आजरा तालुक्याचा पूर्व विभाग व गडहिंग्लजच्या पश्चिम विभागाला लाभ होणार असल्याचे सांगितले.
या विभागाचे आमदार राजेश पाटील म्हणाले, या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी व धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. पण या प्रकल्पाचे खरे श्रेय ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला त्यांनाच जाते. स्व. बाबासाहेब कुपेकरांनी या धरणाचा पाया घातला आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी त्यावर कळस चढविला आहे. या कामाच्या पूर्ततेसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह धरणग्रस्त शेतकरी, लाभक्षेत्रातील शेतकरी, या विभागातील सर्वपक्षिय कार्यकर्ते, धरणग्रस्त संघटनांचे पदाधिकारी यांचे सहकार्य तर राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे पाठबळ मिळाले. सर्वांच्या सहकार्यातून हा आजचा सोहळा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. उचंगीच्या उजव्या तीरावरील रस्त्यासह रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी माजी मंत्री मुश्रीफ व आपण कटीबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला माजी सभापती मसणू सुतार, रचना होलम, सुरेश कुराडे, रामाप्पा करीगार, बाबसाहेब पाटील, चाफवडे सरपंच विलास धडाम, मार्केट कमिटीचे संचालक अभय देसाई, जयसिंग चव्हाण, ठेकेदार प्रताप कोंडेकर, संजय पाटील, दिगंबर देसाई, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर, अभिषेक डोंगळे, आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक अभिषेक शिंपी तसेच जनार्दन बामणे, विक्रमसिंह देसाई यांच्यासह कार्यकारी अभियंता विनया बदामे, संजय राठोड, सुशील पाटील तसेच धरणग्रस्त शेतकरी, लाभक्षेत्रातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. एकनाथ गिलबिले यांनी सूत्रसंचालन केले, तर वाटंगीचे सरपंच शिवाजी नांदवडेकर यांनी आभार मानले.