प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला यंदा शतक पूर्ण झाल्याबद्दल शतकपूर्ती महोत्सवाचे आयोजन सुनियोजितपणे करून महात्मा गांधीजींची तत्वे आणि आदर्श देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या अधिवेशनाद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन विकासमंत्री एच. के. पाटील यांनी दिली.
येथील सुवर्णसौधमध्ये बुधवार दि. 25 रोजी मंत्री पाटील यांनी भेट दिली. महात्मा गांधीजींच्या पुतळा अनावरण समारंभाच्या पूर्वतयारीची पाहणी त्यांनी केली. यावेळी ते बोलत होते. 1924 मध्ये बेळगावात झालेले काँग्रेसचे अधिवेशन हे केवळ पक्षापुरते मर्यादित नव्हते तर सामाजिक सुधारणेचे एक अस्त्र बनले होते. अस्पृश्यता निवारण करून समाजात बंधूभाव निर्माण करणे व स्वातंत्र्यसंग्रामाला बळ मिळवून देणे हा यातून प्रयत्न साधण्यात आला. काँग्रेस अधिवेशन शताब्दी महोत्सव हा ऐतिहासिक व्हावा, यादृष्टीने प्रयत्न असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गांधीजींची तत्वे आणि आदर्श देशातील प्रत्येक नागरिकाला समजावून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने विविध 41 कार्यक्रमांची घोषणा करून त्यांचे वर्षभर आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुवर्णसौधमधील महात्मा गांधीजींच्या भव्य प्रतिमेचे अनावरण शुक्रवार दि. 27 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या समारंभाच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते व स्वातंत्र्यसैनिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. तत्पूर्वी गुरुवार दि. 26 रोजी शहरातील वीरसौध येथील गांधीजींच्या प्रतिमेचे तसेच रामतीर्थनगरातील गंगाधर देशपांडे स्मारक भवनाचे उद्घाटन होईल, अशी माहितीही मंत्री पाटील यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री वीराप्पा मोईली, माजी सभापती बी. एल. शंकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.









