दर्शनासाठी भक्तांची गर्दी, आज महाप्रसादाचे आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात शनिवारी महाशिवरात्री उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी झाली. यानिमित्ताने शिवमंदिरांमध्ये पूजा, शिवनामस्मरण, शिवभजन, अभिषेक, गणहोम यासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. ‘हर हर महादेव, बम बम भोले’चा गजर करत भाविकांनी दर्शन घेतले. कोरोनाच्या संकटानंतर यंदा महाशिवरात्रीसाठी मंदिरे भक्तांनी फुलून गेली होती. विशेषत: रविवार दि. 19 रोजी विविध मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील कपिलेश्वर मंदिर, शनिवार खूट महादेव आर्केड, गोवावेस पंचवटी रिक्षा स्टँड, मिलिटरी महादेव मंदिर, शहापूर मुक्तीधाम, शहापूर खडेबाजार, पोलीस हेडक्वॉर्टर्स, जुने बेळगाव, अनगोळ, वडगाव, विजयनगर, आनंदनगर, शाहूनगर आदी ठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये महाशिवरात्री साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मंदिरांमध्ये आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती.
शहापूर मुक्तीधाम
शहापूर मुक्तीधाम येथील शिवमंदिरात शनिवारी महाशिवरात्री साजरी करण्यात आली. सेवा सुधारणा मंडळातर्फे सालाबादप्रमाणे मध्यरात्री व पहाटे अभिषेक, आरती, पूजा आणि धार्मिक कार्यक्रम झाले. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. भारतनगर शहापूर येथील श्री भक्ती महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर

दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून भक्तांच्यावतीने विश्वस्त मंडळाच्या हस्ते अभिषेक झाला. त्यानंतर पंचामृत अभिषेकाला सुरुवात होऊन शनिवारी पहाटे 5 वाजेपर्यंत अभिषेक सुरू होता. सकाळी 6 वा. विशेष महारुद्राभिषेक झाला. सालाबादप्रमाणे त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि. 19 रोजी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.
वडगाव शिवमंदिर
वडगाव मराठी मुलींची शाळा क्र. 5 येथील शिवमंदिरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. शनिवारी सकाळी पूजा आणि अभिषेक झाला. दिवसभर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. रविवारी दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

शनिवार खूट, महादेव आर्केड
शनिवार खूट महादेव आर्केड येथील महादेव देवस्थानात शनिवारी महाशिवरात्रीनिमित्त पूजा-अर्चा, अभिषेक झाला. त्यानंतर गणहोम करण्यात आला. दिवसभर दर्शनासाठी भक्तांची वर्दळ सुरू होती. रविवारी दुपारी 1 वा. महाप्रसाद होणार आहे. अध्यक्ष गजानन नंदगडकर, राजू गायडोळे, रविंद्र उमराणी, प्रमोद उबाळे यांसह भक्तमंडळी उपस्थित होती.
शहापूर खडेबाजार
शहापूर खडेबाजार येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्राभिषेक करण्यात आला. सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाविकांची दर्शनासाठी वर्दळ वाढली होती.
गोवावेस पंचवटी रिक्षा स्टँड, शिवमंदिर
गोवावेस येथील शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महामृत्युंजय जप, होमहवन करण्यात आला. नवग्रह पूजा, अभिषेक यासह इतर धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. भक्तांना खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
नागझरीनाथ कॉलनी, महादेव मंदिर, टिळकवाडी
शुक्रवार पेठ टिळकवाडी, नागझरीनाथ कॉलनी येथील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळी अभिषेक व पूजा करण्यात आली. सायंकाळी 7 वा. महाआरती झाली. रविवारी सकाळी 8 वा. अभिषेक, सायं. 7 वा. महाआरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे, याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे मंदिर ट्रस्ट कमिटीने आवाहन केले आहे.









