उपवास म्हटला की आधी अनेकांच्या डोक्यात कोणते ‘विशेष पदार्थ’ खायचे हा विचार डोकावतो! अनेक सामग्री डोक्यातच शिजते अन् शेवटी गाडी साबुदाणा खिचडीवर येऊनच थांबते…तेव्हा जास्त विचार करू नका आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहेत सोप्या, पटकन होणाऱ्या उपवासाच्या चविष्ट रेसिपीज्
रताळ्याचा कीस
साहित्य : रताळी, तूप, मिरची, जिरे, ओलं खोबरं, चवीपूरतं मीठ आणि साखर कृती : रताळी स्वच्छ धुवून त्याचा किस करून घ्या. एका कढईत तूप गरम करून मिरची आणि जिऱ्याची फोडणी द्या. त्यात किसलेलं रताळं टाका. वरून चवीपुरतं मीठ आणि साखर टाकून चांगलं परतून घ्या. ओलं खोबरं पेरून वाफेवर किस शिजवून घ्या.
भगरीचा डोसा
साहित्य: ३/४ भगर, १/३ साबुदाणे, साखर एक टीस्पून, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, पाणी भगर, साबुदाणे आणि साखर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. थोडं थोडं पाणी, मीठ, थोडी चिरलेली कोथिंबीर, आलं आणि मिरची जाडसर वाटून घालून सरसरीत पीठ करावे. डोसा तव्यावर तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घ्यावे. डोशाचं बॅटर हलवून मग तव्यावर पसरावे. कडेने आधी पसरावे. नंतर कडेने थोडं तेल सोडावे. दोन्ही बाजूने भाजून घ्यावा. उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसोबत किंवा चटणीसोबत खावा.
साबुदाणा खीर
साहित्य : एक वाटी भिजवलेला साबुदाणा, दूध, वेलची पूड, चवीप्रमाणे साखर आणि मीठ कृती : दूध उकळून त्यात वेलची पूड घालावी. उकळण्यापूर्वीच त्यामध्ये भिजवलेले साबुदाणे टाकावेत. साबुदाणा शिजताना त्यामध्ये चवीप्रमाणे साखर आणि मीठ घालावं. साबुदाणा पारदर्शक झाला की तो शिजला समजून गॅस बंद करावा. सजावटीसाठी सुकामेवा आणि केसर घालावे.
राजगीरा थालीपीठ
साहित्य: दोन वाट्या राजगीरा पीठ, दोन चमचे शेंगदाण्याचे कूट, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर पेस्ट,चवीपूरते मीठ आणि तूप कृती: राजगिराच्या पीठात सर्व साहित्य घालून पीठ पाण्याने मळून घ्या. मळलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून थालीपीठ थापा. तव्यावर तूप टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजा. गरमागरम थालीपीठदही, ओल्या नारळाची चटणीसोबत नक्कीच खा.
रताळ्याचे गोड काप
साहित्य: २-३ रताळी, ४-५ चमचे साखर, तूप, दोन चमचे ओल्या नारळाचा किस, अर्धा चमचा वेलचीपूड कृती: रताळं सोलून पातळ चकत्या कापाव्या. पॅनमध्ये तूप तापवून रताळ्याच्या चकत्या पसरून घाला. झाकणावर पाणी ठेवून पाच मिनिटं शिजवावे. वरून साखर, वेलची पूड आणि नारळाचा किस घालून मिसळून घ्यावे. पुन्हा झाकण लावून दोन मिनिटे शिजवावे. साखर वितळली की गॅस बंद करावा.