हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ : आज महाप्रसाद
वार्ताहर/कुद्रेमनी
हर हर महादेवचा जयघोष आणि मंत्रोच्चाराच्या भक्तीमय वातावरणात देवरवाडी (ता.चंदगड) येथील श्री क्षेत्र वैजनाथ देवस्थान मंदिरात यंदाचा महाशिवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात झाला. मंदिरातील शिवलिंगावर मुख्य अभिषेक आणि देवी पार्वतीच्या मूर्तीचे विधीवत पूजन होवून यंदाच्या महाशिवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. मंगळवारी रात्री 12 वाजता मंदिराच्या स्थानिक देवस्थान उपसमितीचे प्रतिनिधी अनिल भोगण, शंकर भोगण, जयवंत कांबळे, शिवाजी भोगण, प्रमोद केसरकर आदींसह मंदिरातील पुरोहितांच्या उपस्थितीत दूध, तुपाचा अभिषेक व बेलपत्र वाहून मुख्य अभिषेकाचा विधी झाला. यावेळी हर हर महादेव, हर हर पार्वती देवीचा जयघोष करून महाआरतीचा विधी पार पडला.
बुधवारी पहाटे मंदिरात याम पूजेचा विधी झाला. दिवसभर शेकडो भाविकांनी मंदिरातील शिवलिंगाचे देवी पार्वतीचे दर्शन घेतले. दरम्यान दुपारी चंदगड तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंदिराला भेट दिली. देवस्थान उपसमितीने त्यांचे स्वागत केले. देवदर्शन घेऊन त्यांनी मंदिर परिसराचा कायापालट करून हे स्थळ पर्यटनस्थळ करण्याचे आश्वासन मंदिराच्या स्थानिक उपसमितीला दिले. विद्युत रोषणाईने मंदिर परिसराची आकर्षक सजावट केली होती. भाविकांची देवदर्शनासाठी दिवसभर ये-जा सुरू होती. सर्व भाविकांना देवदर्शन सुलभ होण्याची व्यवस्था, वाहने पार्किंग, पाणी व्यवस्था, मंदिराच्या स्थानिक उपसमितीने उत्तमप्रकारे केली होती. यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी चंदगड पोलिसांचा बंदोबस्त होता.
आज महाप्रसाद
गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून देवस्थान उपसमितीने महाप्रसादाचे आयोजन केले असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानच्या स्थानिक उपसमितीने केले आहे.










