वृत्तसंस्था/ विजयनगर (कर्नाटक)
येथे सुरू असलेल्या भारतीय खुल्या उंचउडी तसेच भालाफेक, गोळाफेक, राष्ट्रीय स्पर्धेत पुरुषांच्या लांबउडीमध्ये जेस्विन अल्ड्रीनने नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात अल्ड्रीनने 8.42 मीटरची नोंद केली. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंचउडीत सुवर्णपदक मिळाले.
पुरुषांच्या लांबउडीमध्ये अल्ड्रीनने तिसऱया टप्प्यात 8.42 मीटरची नोंद करीत सुवर्णपदक व नवा राष्ट्रीय विक्रम करताना यापूर्वी मुरली श्रीशंकरने नोंदविलेला 8.26 मीटरचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. या क्रीडा प्रकारात केरळच्या मोहम्मद याहियाने 7.85 मीटरचे अंतर नोंदवित रौप्य तर ऋषभ ऋषिश्वरने 7.77 मीटरचे अंतर नोंदवित कांस्यपदक घेतले.
तामिळनाडूच्या प्रवीण चित्रावेलने पुरुषांच्या तिहेरी उडीत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. त्याने या क्रीडा प्रकारात 17.17 मीटरचे अंतर नोंदवित यापूर्वी पॉलने नोंदविलेला स्पर्धा विक्रम मागे टाकला. यावेळी पॉलला या क्रीडा प्रकारात दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. पॉलने 16.61 मीटरचे अंतर नोंदवित रौप्य तर अब्दुल्ला अबुबकरने 15.93 मीटरचे अंतर नोंदवित कांस्यपदक घेतले. पुरुषांच्या उंचउडीमध्ये महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने सुवर्णपदक मिळविताना 2.24 मीटरचे अंतर नोंदवित नवा स्पर्धा विक्रम केला. सर्वेशने या क्रीडा प्रकारात यापूर्वी नोंदविलेला सी. बालसुब्रम्हण्यमचा 2.09 मीटरचा विक्रम मागे टाकला. या क्रीडा प्रकारात पश्चिम बंगालच्या रॉयने रौप्यपदक तर ओडिशाच्या मांझीने कांस्यपदक घेतले. महिलांच्या उंच उडीत रुबिना यादव आणि अभिनया शेट्टी यांनी संयुक्त आघाडीचे स्थान मिळविताना 1.74 मीटरचे अंतर नोंदविले. तामिळनाडूच्या निरंजना संपतने 1.60 मीटरचे अंतर नोंदवित कांस्यपदक घेतले. केरळच्या गायत्री शिवकुमारने महिलांच्या तिहेरी उडीत सुवर्णपदक मिळवताना 12.98 मीटरचे अंतर नोंदविले. या क्रीडा प्रकारात तामिळनाडूच्या आर. पुनिताने रौप्य तर शर्वरी परुळेकरने कांस्यपदक घेतले.









