वृत्तसंस्था/ पुणे
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या इलाईट अ गटातील सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर यजमान महाराष्ट्राने झारखंडला चोख प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात 1 बाद 149 धावा जमवल्या. तत्पुर्वी झारखंडचा पहिला डाव 403 धावात आटोपला. झारखंडच्या डावात महाराष्ट्राच्या हितेश वळूंजने 91 धावात 6 गडी बाद केले. झारखंडचा कर्णधार विराट सिंगने शतक (108) झळकवले.
या सामन्यात झारखंडने 5 बाद 295 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे शेवटचे पाच गडी 108 धावांची भर घालत तंबूत परतले. कर्णधार विराट सिंगने 3 षटकार आणि 8 चौकारासह 108 तर कुमार सुरजने 1 षटकार आणि 11 चौकारासह 83, नदीमने 7 चौकारासह 41, शुक्लाने 2 षटकार आणि 1 चौकारासह 28 तर वरुण अॅरॉनने 1 षटकार आणि 4 चौकारासह 29 धावा जमवल्या. महाराष्ट्रातर्फे हितेश वळूंजने 91 धावात 6 तर आशय पालकरने 64 धावात 2, दधे आणि घोष यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
महाराष्ट्राच्या डावाला सिद्धेश वीर आणि पवन शहा यांनी सावध सुरुवात करून देताना सलामीच्या गड्यासाठी 44 धावांची भागीदारी केली. झारखंडच्या आशिषकुमारने सिद्धेश वीरला त्रिफळाचित केले. त्याने 2 चौकारासह 18 धावा जमवल्या. त्यानंतर शहा आणि नौशाद शेख यांनी दिवसअखेर दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 105 धावांची भागीदारी केली. शहा 8 चौकारासह 64 तर नौशा शेख 9 चौकारासह 63 धावावर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक : झारखंड प. डाव सर्वबाद 493 (विराट सिंग 108, कुमार सुरज 83, नदीम 41, कुशाग्र 36, अॅरॉन 29, शुक्ला 28, सिद्दक्की 27, वळूंज 6-91, पालकर 2-64), महाराष्ट्र प. डाव 42 षटकात 1 बाद 149 (सिद्धेश वीर 18, पवन शहा खेळत आहे 64, नौशाद शेख खेळत आहे 63, आशिष कुमार 1-44).









