सावगाव कुस्ती मैदान : अनुजकुमारचा प्रेक्षणिय विजय
बेळगाव : सावगाव येथे जय हनुमान कुस्तीगिर संघटना व मराठी संघटक बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धुलिवंदनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या बाळू अपराधने उदयकुमार दिल्लीला गुणावर पराभव केले तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत अन जकुमार दिल्लीने उदय खांडेकरला आकडी डावावरती चीत करुन उपस्थित 10 हजारहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली.

या आखाड्यातील प्रमुख कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराध व नॅशनल पदक विजेता उदयकुमार दिल्ली ही कुस्ती डॉ. यलप्पा पाटील व सावगाव कुस्तीगिर संघटना यांच्या हस्ते लावण्यात आली. दुसऱ्या मिनिटाला बाळू अपराधने एकेरी पट काढून उदयकुमारला खाली घेत घिस्स्यावर भिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून उदयकुमारने सुटका करुन घेतली. 4 थ्या मिनिटाला उदयकुमारने पायाला चाट मारुत बाळू अपराधला खाली घेत एकलांगी भरुन चीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून अपराधने सुटका करुन घेतली. 12 व्या मिनिटाला बाळू अपराधने दुहेरी पट काढून उदयकुमारला खाली घेत पुन्हा घिस्स्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला पण त्यातूनही उदयकुमारने सुटका करुन घेतली. 20 मिनिटानंतर ही कुस्ती गुणावर निकाली करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. त्यामध्ये 22 व्या मिनिटाला बाळू अपराधने एकेरी पट काढून पायाला टाच मारुन गुण मिळवून विजय मिळविला.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उदय खांडेकर पुणे व अनुजकुमार दिल्ली ही कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्या मिनिटाला उदय खांडेकरने एकेरी पट काढून पायाला आकडी लावून साल्तो मारण्याचा प्रयत्न करताना उदय खांडेकरचा डाव त्याला अंगलट येऊन अनुजकुमारने त्याच आकडीवरती प्रतिआकडी लावून उदय खांडेकरला चारीमुंड्या चीत करुन प्रेक्षणिय विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कामेश पाटील कंग्राळी व करण दोहा सांगली यांची कुस्तीही डावप्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी कुस्ती गुणावरती घेण्यात आली. त्यामध्ये करण दोहाने एकेरी पट काढून कामेशवर गुण मिळवित विजय मिळविला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत विशाल सांगलीने विक्रम शिरोळीचा एकचाक डावावरती अवघ्या मिनिटात चीत केले. पाचव्या क्रमांकाची कुस्ती प्रेम जाधव कंग्राळी व संजू इंगळगी दर्गा ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली पण वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली.
सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत पार्थ पाटील कंग्राळीने संतोष मोटे सांगलीला पायाची एकलांगी डावावरती प्रेक्षणिय विजय मिळविला. सातव्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वी पाटील कंग्राळी व पवन चिगदीनकोप ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजल. पण कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रथमेश हट्टीकर कंग्राळीने बॉबी ठाकूरला घीस्सा डावावरती चीत केले. नवव्या व दहाव्या क्रमांकाची कुस्ती निखिल कंग्राळी व महेश बिर्जे तिर्थकुंडेला विजयी घोषित करण्यात आले. निरंजक येळ्ळूर, यलालिंग भांदुर गल्ली, स्वयम जाधव राशिवडे, हर्ष कंग्राळी, सिद्धार्थ तिर्थकुंडे, रोहण बी.के. कंग्राळी, रोहित सावगाव, राहुल किणये, महांतेश संतीबस्तवाड, पार्थ पाटील, मंजुनाथ संतीबस्तवाड, रामदास काकती, मंथन सांबरा, ओमकार खादरवाडी, लालू बी.के. कंग्राळी, मयूर तिर्थकुंडे, वेदांत मासेकर, सूरज मजगाव, वेदांत भाकोजी वडगाव यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजय मिळविला.

महिलांची कुस्ती राधिका संतीबस्तवाड विरुद्ध भक्ती पाटील कंग्राळी ही कुस्ती डॉ. सोनाली सरनोबत, समीर सरनोबत, माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे, पावशे यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत राधिका संतीबस्तवाडने एकेरी पट काढून भक्ती पाटीलवर कब्जा मिळवत एकचाक मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून भक्तीने सुटका करुन घेतली. चौथ्या मिनिटाला भक्तीने दुहेरी पट काढून राधिकेला खाली घेत झोळी डावावरती चीत केले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती श्रावणी तरळे खंबेवाडी व प्रभा खादरवाडी ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली पण वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली.तिसऱ्या कुस्तीत कल्याणी अंबोळकर न आल्याने प्रज्ञा पाटील कंग्राळीला विजयी घोषित करण्यात आले.
आकर्षक कुस्तीत ओमकार सावगावने संकेत कोल्हापूरचा एकलांगी डावावरती प्रेक्षणिय विजय मिळविला. तर स्वप्निल सुतार सावगावने श्रीनंद निलजीचा निकाली डावावरती विजय मिळविला. आखाड्याचे पंच म्हणून कृष्णा पाटील कंग्राळी, अतुल शिरोळे, गणपत बन्नोशी, मालोजी येळ्ळूर, नाना पाटील, नवीन पाटील मुतगे, सुरेश अष्टगी, कृष्णा बिर्जे, राजू मुतगे, लक्ष्मण तेऊरवाडी, पिराजी मुचंडीकर, मनोज बिर्जे, हरिशचंद्र बेळगुंदी, मारुती तुळजाई यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे यांनी केले तर पुंडलिक पावशे आणि सहकारी यांच्या हलगीच्या तालावर सर्व कुस्तीशौकिनांना खिळवून ठेवले. कुस्तीमैदान यशस्वी करण्यासाठी सावगाव कुस्तीगिर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









