पोलंड डायमंड लीग : 3000 मी. स्टीपलचेस प्रकारात सहावे स्थान : ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला पहिला भारतीय अॅथलिट
वृत्तसंस्था/वार्सा (पोलंड)
महाराष्ट्रातील बीड जिह्याचा सुपुत्र असलेला अविनाश साबळे रविवारी सिलेसिया डायमंड लीग मीट स्पर्धेत चमकला. त्याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत कारकीर्दीतील दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन करत सहावे स्थान पटकावले. यासह धावपटू अविनाश पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेसाठी पात्र ठरला. तो या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पहिला ट्रॅक अँड फील्ड अॅथलिट तर एकूण सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, अविनाश दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे.
पोलंड येथील सिलेसिया येथे डायमंड लीग स्पर्धा सुरु आहे. यावेळी सोमवारी 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात राष्ट्रीय चॅम्पियन साबळेने 8:11.63 मिनिटात हे अंतर पूर्ण केले, जे त्याच्या 8:11.20 या राष्ट्रीय विक्रमापेक्षा थोडे चांगले आहे. 28 वर्षीय खेळाडूने मात्र पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठीच्या वेळेआधीच ही स्पर्धा पूर्ण केली. 8:15 सेकंदांच्या फरकाने मोठ्या फरकाने त्याने ही कामगिरी केली. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता कालावधी 1 जुलै 2023 पासून सुरू झाला असून 30 जून 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. मोरोक्कोच्या विश्व आणि ऑलिम्पिक चॅम्पियन एल सूफीनने 8:03.16 च्या विक्रमी वेळेत शर्यत जिंकली तर केनियाचा अब्राहम किबिवोट (8:08.03) आणि लिओनार्ड किपकेमोई बेट (8:09.45) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा सहावा भारतीय
2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा अविनाश साबळे सहावा भारतीय आणि देशातील पहिला ट्रॅक अॅथलीट ठरला. याआधी 20 किमी चालण्याच्या शर्यतीत अक्षदीप सिंग, विकास सिंग आणि परमजीत सिंग बिश्त यांनी ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. याशिवाय, महिलांच्या 20 किमी चालण्याच्या स्पर्धेत प्रियांका गोस्वामी आणि लांब उडीपटू मुरली श्रीशंकर हे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहे. यांच्यानंतर अविनाशने पोलंड डायमंड लीगमध्ये सहावे स्थान मिळवत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. याशिवाय, तो पुढील महिन्यात हंगेरी येथे होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी देखील पात्र ठरला आहे.









