आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ फोंडा
तिसऱ्या मनोहर पर्रीकर गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या ‘ब’ गटात महाराष्ट्रच्या अथर्व माडकरने अजिंक्यपद पटकावले. तामिळनाडूच्या आश्विंथ मायकलने द्वितीय तर गुजरातच्या रुद्र पाठकने तृतीय स्थान प्राप्त केले. स्पर्धेत प्रभावी कामगिरी केलेल्या गोव्याच्या देवेश आनंद नाईकने दहावे स्थान पटकावले. गोवा बुद्धिबळ संघटनेतर्फे ही स्पर्धा ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये खेळविण्यात येत आहे.
अथर्व माडकरने 10 फेऱ्यांतून 8.5 गुण प्राप्त केले. आश्विंथ मायकल व रुद्र पाठकने 8 गुण मिळविले. विजेत्या अथर्व माडकरला रु. 1,75,000, आश्विंथ मायकलला रु. 1,35,000 व रुद्र पाठकला रु. 1,00,000 देण्यात आले. महाराष्ट्रच्या ऋषिकेश कबनुराकरने चौथे, तामिळाडूच्या गोकुळ जी. ने पाचवे, महाराष्ट्रच्या श्रीपाद जोशी सहावे, राजस्थानच्या कांतिलाल दावे सातवे, केरळच्या उन्नीकृष्ण एम. ए. ने आठवे स्थान मिळविले. त्यांचे प्रत्येकी 8 गुण झाले. तेलंगणाच्या सृजन सोलेटीने 7.5 गुण मिळवून नववे स्थान प्राप्त केले.
गोव्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
गोव्याच्या खेळाडूंनी या स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली. देवेश नाईकने 7.5 गुण मिळवून दहावे स्थान मिळविण्यात यश मिळविले. त्याला रु. 31,000 चे पारितोषिक प्राप्त झाले. 11 वर्षाखालील जोशुआ मार्क तेलीसने 7.5 गुण मिळवून पंधरावे स्थान प्राप्त केले. अनिरुद्ध पार्सेकरने 7 गुण मिळवून पंचवीसावे, डब्लूसीएम गुंजल चोपडेकर 6.5 गुण मिळवून सव्वीसावे, आयुष शिरोडकर एकोणतीसावे, दत्ता कांबळी बेचाळीसावे तर जॉय काकोडकरने सत्तेचाळीसावे स्थान प्राप्त केले. त्यांचे प्रत्येकी 6.5 गुण झाले.
एड्रीक वाझ, राजवीर पाटील व इरवीन आल्बुकॅर्क यांना विविध मानांकन गटात उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट गोव्यातील खेळाडू म्हणून शुभ बोरकर, ऋषीकेश परब व आर्याव्रत नाईक देसाई यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच वॅटरन्स गटात सुहास अस्नोडकरला द्वितीय पारितोषिक देण्यात आले.
13 वर्षाखालील गटात सारस पोवारने तृतीय, 7 वर्षाखालील गटात इवान तेलीस प्रथम, 15 वर्षाखालील गटात अर्चिता अग्रवाल, साईजा देसाई, कापाडीया खनक, चैतन्य पाटील, आर्थ शेणवी कारापूरकर, आश्मान नाईक देसाई यांना पारितोषिके मिळाली. 13 वर्षाखालील गटात अन्विता साठी व 11 वर्षाखालील गटात स्कायला रॉड्रीगीसने प्रथम स्थान पटकावले. सच्चित पै, रापोस मॅक्सवाल, अर्थव शिरोडकर, विहान तारी, रिशित गावस, अथर्व घाटवल तसेच प्रयांक गावकर, अन्वी देसाई, नव्या नार्वेकर, त्विशा देसाई व वानीया दुकळे यांना पारितोषिके देण्यात आली.
प्रतिष्ठीत बुद्धिबळ स्पर्धेमुळे गोव्यातील खेळाडूंना योग्य व्यासपीठ-रोहन गावस देसाई पारितोषिक वितरण समारंभाला गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव रोहन गावस देसाई, सामाजिक कार्यकर्ते उत्पल पर्रीकर, गौरीश धोंड, माजी आमदार नरेश सावळ, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी, खजिनदार विश्वास पिळर्णकर, उपाध्यक्ष सागर साकोर्डेकर, स्पर्धा समन्वयक अरविंद म्हामल, सदस्य अमोघ नमशीकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रोहन गावस देसाई यांनी आपल्या भाषणात ही प्रतिष्ठीत स्पर्धा आयोजित केल्याबद्दल गोवा बुद्धिबळ संघटनेचे अभिनंदन केले. या स्पर्धेमुळे गोव्यातील खेळाडूंना एक उत्कृष्ट व्यासपीठ लाभले असून त्यांच्यात स्पर्धात्मक भावना तयार होत असल्याचे सांगितले. उत्पल पर्रीकर म्हणाले या स्पर्धेला अल्पावधीतच प्रतिष्ठा लाभली असून खेळाची प्रगती होत आहे. माझ्या वडीलांच्या सन्मानार्थ ती होत असल्यामुळे ही आपल्यासाठी जिव्हाळ्याची स्पर्धा असल्याचे ते म्हणाले. स्वागत महेश कांदोळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी काकोडकर यांनी केले. अमोघ नमशीकर यांनी आभार मानले.









