1 ली खेलो इंडिया बीच स्पर्धा, दीव 2025 : पेंचक सिलटमध्ये अंशुल कांबळेला रौप्य
वृत्तसंस्था/ दीव
पदकांचा धडका कायम राखत पहिल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राने 5 व्या दिवशी बीच सॉकरमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. पेंचक सिलट प्रकारात महाराष्ट्राच्या अंशुल कांबळेने रूपेरी यश संपादन केले. घोघला समुद्र किनाऱ्यावर संपलेल्या बीच सॉकरमधील पुरूष गटात केरळने महाराष्ट्रावर 3-16 गोलने मात केली. अंतिम फेरीत केरळने गोवा संघाला 12-4 गोलने पराभूत करीत सुवर्णपदक पटकावले. उपांत्य फेरीतील अपयशामुळे महाराष्ट्रसह लक्षदिप संघाला कांस्यपदक बहाल करण्यात आले.
पारंपारिक पेंचक सिलट प्रकारात महाराष्ट्रासह मणिपूर, नागालँड संघांनी वर्चस्व गाजवले. महाराष्ट्राच्या संघाने पेंचक सिलट प्रकारात सर्वाधिक पदकांची लयलूट केली. महाराष्ट्राच्या अंशुल कांबळेने रौप्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या मोहिमेची रूपेरी सांगता केली. 75 ते 80 किलो वजनी गटातील अंतिम लढती महाराष्ट्राच्या अंशुल कांबळे विरूध्द पंजाबच्या अजय कुमार यांच्यात रंगली. अटीतटीच्या लढतीत पंजाबच्या अजयकुमारने अंशुलवर 29-21 गुणांनी मात करीत सुवर्णपदकावर नाव कोरले.
मुंबईत सराव करणाऱ्या अंशुलचे हे स्पर्धेतील दुसरे रौप्यपदक आहे. रामचंद बदक, मुकेश चौधरी यांनीही कांस्यपदकाचे यश संपादन केले. पेंचक सिलटमध्ये महाराष्ट्राने 3 सुवर्ण, 4 रौप्य व 5 कांस्य अशी एकूण 12 पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्राच्या पेंचक सिलट संघाने उपविजेतेपद पटकावले. दरम्यान, पदकतक्त्यात 5 सुवर्ण, 5 रौप्य, 10 कांस्य एकूण 20 पदके जिंकून महाराष्ट्र दुस्रया स्थानावर आहे. 5 सुवर्ण 6 रौप्य, 3 कांस्य एकूण 14 पदकांची कमाई करीत मणिपूरने अव्वल स्थान गाठले आहे.









