रत्नागिरी :
मागील अडीच वर्षात उद्योग क्षेत्राशी निगडीत घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या धोरणांची अंमलबजावणी करत महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर नेण्यात आपल्याला यश आले. पुढील पाच वर्षे हे अग्रस्थान कायम राहील यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. निवडणुकीत राज्यातील जनतेला उद्योगासंदर्भात दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता यापुढील काळात करून प्रत्यक्षात उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीस आमचे प्राधान्य राहणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाली येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
राज्यातील नव्या सरकारमध्ये पुन्हा उद्योगमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रविवारी दुपारी हेलिकॉप्टरने सामंत यांचे पाली येथे आगमन झाले. मागीलअडीच वर्षाच्या कालावधीत उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक आणण्यात आपल्याला यश आले. उद्योगासंदर्भातील बदललेल्या धोरणांचा उद्योजकांना चांगला फायदा झाला. गडचिरोलीपासून रत्नागिरीच्या टोकापर्यंत आपण नव्या उद्योगांना मंजुरी मिळवून देण्यात यशस्वी झालो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ३० हजार कोटींचा डिफेन्स व सेमीकंडक्टर हे प्रकल्प आपण आणले.आता प्रत्यक्षात त्याची उभारणी केली जाईल. त्यातून रोजगार निर्मिती कशी होईल, यासाठी प्राधान्यक्रमाने काम केले जाणार आहे. टाटा स्कील सेंटरच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण केले जात आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उद्योग भवन उभारणी होत आहे. त्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देण्यांचे काम सुरू आहे. दावोसमध्ये झालेल्या करारानुसार आता गुंतवणुकीला चालना मिळणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.








