कोल्हापूर :
मुंबई येथे मुख्यमंत्री 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करण्राया राज्यस्तरीय महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय व निमशासकीय संस्था, मंडळे आणि शासकीय कंपन्यांचा सत्कार करण्यात आला. या विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच प्रमुख संस्थांचा गौरव करण्यात आला. यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण , महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित , पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण , महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचा समावेश होता. कोल्हापूर महापालिकेच्या तत्कालीन प्रशासक आणि मेडा च्या संचालिका डॉ कादंबरी बलकवडे यांनाही मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मंत्रालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, तसेच संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत या संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा करण्यात आली. या संस्थांनी कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जनहिताच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यात आला.
मेडाच्या संचालक जनरल डॉ. कादंबरी बलकवडे यांचा विशेष सन्मान या समारंभात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या (मेडा ) संचालक जनरल डॉ. कादंबरी बलकवडे यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. बलकवडे यांनी मेडाच्या माध्यमातून अक्षय ऊर्जा, ऊर्जा संवर्धन आणि टिकाऊ विकासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मेडाने सौरऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संस्थांच्या कार्याची प्रशंसा करताना सांगितले, “या सर्व संस्थांनी कार्यालयीन सुधारणा आणि जनहिताच्या प्रकल्पांना प्राधान्य देत उत्तम कामगिरी केली आहे. त्यांच्या या योगदानामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला गती मिळाली आहे.“ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या संस्थांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “या संस्थांनी जनतेसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे.“ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भविष्यातील प्रकल्पांसाठी शुभेच्छा देताना या संस्थांना अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले.
- सन्मानित संस्थांची कामगिरी
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणने मुंबईतील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी प्रभावी योजना राबवल्या असून, अनेक कुटुंबांना हक्काची घरे उपलब्ध करून दिली.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितने वीज निर्मितीमध्ये कार्यक्षमता वाढवून राज्यातील वीज पुरवठा सुधारण्यात मोलाची भूमिका बजावली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने पुणे आणि परिसरातील पायाभूत सुविधा विकासासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतले, ज्यामुळे शहरी विकासाला चालना मिळाली.
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणने (मेडा) अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली, विशेषत? ग्रामीण भागात सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक विकासाला चालना देताना नवीन उद्योगांना प्रोत्साहन दिले आणि रोजगार निर्मितीला गती दिली.
“हा सन्मान माझ्यासाठी आणि मेडाच्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आम्ही अक्षय ऊर्जा आणि टिकाऊ विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि पुढील काळातही आमचे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू ठेवू.“
– डॉ. कादंबरी बलकवडे








