ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर महाविकास आघाडीत मोठा भूकंप झाला. शिवसेनेचे एक-दोन नव्हे तर ४० हुन अधिक आमदार शिंदेंसोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनाही (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनतर शिंदे आणि भाजप एकत्र येत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यन, सेनेकडून बंडखोर आमदार अपात्र ठरावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. असे असताना बंडखोर आमदार संजय राठोड (MLA Sanjay Rathod) यांनी उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांचा ‘मातोश्री’वर परत येण्याचा विचार सुरू होता. तसेच ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असे खळबळजनक विधान राठोड यांनी केलं आहे. ते यवतमाळ येथे आल्यावर बोलल होते.
अधिक वाचा– एकनाथ शिंदे हे राजकारणातील मॅराडोना..
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिकाही बंड नव्हे तर उठाव होता. ‘आम्ही आजही परत जायला तयार आहोत. पण मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर, असे खळबळजनक विधान शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर प्रथमच यवतमाळला आलेल्या आमदार संजय राठोड यांनी केले. दरम्यान, पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गटात गेलेल्या संजय राठोड यांच्या विरोधात कालपर्यंत घोषणाबाजी करणारे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही आज राठोड यांच्या स्वागतासाठी पुढाकार घेतला होता. दरम्यान संजय राठोड यांनी मातोश्रीवर परत जाण्यासंबंधी विधान केल्याने चर्चा रंगली आहे.
पक्षातील उठावानंतर सर्वांचाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मातोश्री’वर परत येण्याचा विचार सुरू असताना, काही व्यक्तींच्या अनावश्यक बडबडीमुळे ते शक्य झाले नाही, असा आरोपही खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता राठोड यांनी केला. बंडखोर आमदार संजय राठोड यांचे आज प्रथमच यवतमाळ येथे दाखल झाले. “आम्ही आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत. मात्र मविआत शिवसेनेवर कायम अन्याय झाला. शिंदे गटात गेलेल्या अनेक मंत्री, आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेतील व पक्षातील गळचेपीबद्दल वारंवार सांगूनही आमच्या समस्यांकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे आत्मसन्मानार्थ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वासाठी व लोकहिताची कामे करण्यासाठी आम्हाला बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता,” असे राठोड म्हणाले.
बंडखोरी केल्यानंतर आमदार संजय राठोड यांच्या विरोधात यवतमाळ जिल्ह्यात मोठे विरोध प्रदर्शन झाले होते. शिवसैनिक त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, राठोड हे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहचले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची संवाद सांधला. आपण ही भूमिका का घेतली? त्याचे स्पष्टीकरणही देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राठोड यांनी संजय राऊत यांना लक्ष करत त्यांच्यामुळेच ही वेळ आल्याचे सांगितले.