वृत्तसंस्था/ पुणे
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या इलाईट अ गटातील सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर यजमान महाराष्ट्र 157 धावांनी पिछाडीवर आहे. दिवसअखेर महाराष्ट्रने दुसऱ्या डावात 3 बाद 187 धावा जमविल्या होत्या.
विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यातील या सामन्यात महाराष्ट्रचा पहिला डाव 208 धावात आटोपल्यानंतर विदर्भने 6 बाद 439 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा पहिला डाव 552 धावांवर आटोपला. करुण नायरने 129, कर्णधार अक्षय वाडकरने 90, ध्रुव शोरेने 92, अर्श दुबेने 46 धावा केल्या. महाराष्ट्रतर्फे हितेश वळुंजने 4 तर प्रदिप दधेने 3 आणि पालकरने 2 गडी बाद केले. विदर्भने पहिल्या डावात महाराष्ट्रवर 344 धावांची भक्कम आघाडी मिळविली. महाराष्ट्रने दुसऱ्या डावात 59 षटकात 3 बाद 187 धावा जमविल्या. मुर्तजा ट्रंकवाला 15 चौकारांसह 86 तर दिग्वीजय पाटील 7 चौकारांसह 61 धावांवर खेळत आहेत. महाराष्ट्रचा संघ अद्याप 157 धावांनी पिछाडीवर असून सामन्यातील एक दिवस बाकी आहे.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र प. डाव 208, विदर्भ प. डाव 552, महाराष्ट्र दु. डाव 3 बाद 187.









