मंगळवारच्या सुनावणीत वकिलांचा युक्तिवाद
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटला क्रमांक 125 ची मंगळवारी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीला सर्व 32 संशयित हजर होते. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदविण्यासह संशयितांच्यावतीने वकिलांनी युक्तिवाद केला. त्यामुळे 11 सप्टेंबर रोजी खटल्याची अंतिम सुनावणी होणार असून त्यादिवशी निकाल दिला जाणार आहे.
येळ्ळूर गावच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य फलक हटविण्यात आल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना बेदम मारहाण केली. उलट ग्रामस्थांवरच सात गुन्हे दाखल केल्याने न्यायालयात या खटल्यांची सुनावणी सुरू आहे. यापूर्वी तीन खटल्यांची सुनावणी पूर्ण होऊन सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तर चार खटल्यांची सुनावणी अद्याप सुरू आहे. त्यापैकी खटला क्रमांक 125 मध्ये पोलिसांनी एकूण 42 जणांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप दाखल केला आहे. यापैकी सात जणांना वगळण्यात आले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे 32 जणांविरोधात खटला सुरू आहे.
मंगळवारच्या सुनावणीला सर्व 32 जण हजर होते. यापूर्वी झालेल्या सुनावणीला चौघेजण गैरहजर राहिल्याने त्यांना न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी आरोपींचा जबाब नेंदविण्यात आला. त्याचबरोबर संशयितांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. शाम पाटील यांनी युक्तिवाद केला. आता या खटल्याची अंतिम सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार असून त्यादिवशी न्यायालयाकडून निकाल दिला जाणार आहे.









