Maharashtra SSC Result 2023 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्रात दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 93.83 टक्के लागला. यंदाही बारावीप्रमाणं दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. 3.82 टक्क्यांनी मुली पुढे आहेत. एकूण 37 विषयांची परीक्षा झाली. त्यापैकी एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्के नोंदवण्यात आला आहे. यंदा सर्वाधिक निकाल कोकणचा तर सर्वात कमी निकाल नागपूरचा लागला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी 1 वा. ऑनलाईन पाहता येणार आहे. 10 हजार शाळांचा निकाल 100 टक्के लागल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल
दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी 92.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.
विभागवार निकाल
कोकण : 98.11 टक्के
कोल्हापूर : 96.73 टक्के
पुणे : 95.64 टक्के
मुंबई : 93.66 टक्के
औरंगाबाद : 93.23 टक्के
अमरावती : 93.22 टक्के
लातूर : 92.67 टक्के
नाशिक : 92.22 टक्के
नागपूर : 92.05 टक्के