जय जय महाराष्ट्र माझा’ हे शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजातील स्फुर्तादायक महाराष्ट्र गीत गेली 63 वर्षे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या ओठावर हे अभीमान गीत आहे, तर या गीताला राज्य सरकारने नुकताच राज्य गीताचा दर्जा सुध्दा दिला. काल महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्वत्र हे गीत मोठ्या दिमाखात वाजत होते. मात्र हे गीत गाणाऱ्या शाहीर साबळे यांच्या संघर्षमय जीवन प्रवासावर चार दिवसापूर्वी आलेल्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाला मात्र मराठी लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. काही वर्षापूर्वी मुंबईचा डॉन अरूण गवळीवर आलेल्या दगडी चाळ आणि हॅडी चित्रपटाला लोक डोक्यावर घेतात तर गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना पोलीस कुमक बोलवावी लागते, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या लोककलेचे जे ब्रॅण्ड अॅम्बेसडर होते, महाराष्ट्र शाहीर होते त्यांच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद ही महाराष्ट्राची खंतच म्हणावी लागेल.
1 मे 1960 ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि 1960 सालीच जय जय महाराष्ट्र माझाची रेकॉर्ड निघाली, राजा बढे यांनी लिहीलेले संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलेले आणि शाहीर साबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेले हे शौर्य गीत जणू प्रत्येक सभा-समारंभात वाजू लागले, त्याकाळी कोणत्याही पक्षाची सभा असो कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो महाराष्ट्र गीत वाजल्याशिवाय कार्यक्रम होत नसे. दोनच दिवसापूर्वी हे गीत अजरामर करणारे शाहीर साबळे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर आधारीत महाराष्ट्राचा शाहीर हा चित्रपट प्रदर्शित झाला, दुसऱ्याच दिवशी हा सिनेमा जवळच्या चित्रपटगृहात पाहण्यासाठी गेलो असता, चित्रपट पाहण्यासाठी केवळ 25 ते 30 लोक सिनेमागृहात उपस्थित होते. मात्र आज त्याच शाहीरांच्या गाण्यांच्या व्हॉटसअॅप स्टेटसला ऊत आल्याचे बघायला मिळाले.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी शाहीरांनी दिलेले योगदान मोठे होते. शाहीर अमर शेख, शाहीर जैनू शेख, शाहीर आत्माराम पाटील यांच्यासोबतच महान कवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सारा महाराष्ट्र घुसळून काढला होता. शाहीर साबळे यांनी तर महाराष्ट्रातील विविध भागातील लोककला महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पोहचविली. भारूड, पोवाडा, कोळीगीत, वाघ्या-मुरळी, शेतकरी नफत्य, लावणी, जोगवा, चिपळुणी, बाल्याचा नाच, भारूड, कोळीगीते आणि मुक्त नाट्यो त्यांनी सादर केली. मुंबईत मराठी माणसाची गळचेपी होत असताना त्यांनी नाटकाच्या माध्यमातून मराठी लोकांना जागृत करण्याचे काम केले होते. आंधळ दळतंय, नारदाचा रिपोर्ट, यमराज्यात एक रात्र अशी एकाहून एक मुक्त नाट्या करताना त्यांनी तत्कालीन सामाजिक व्यवस्थेवर जोरदार ताशेरे ओढले. अंधश्रध्दा, दाऊबंदी यावर त्यांनी भाऊडाच्या माध्यमातून प्रबोधन केले ही भारूड तुफान लोकप्रिय झाली होती. पदश्री या किताबाने सन्मानित होणारे तसेच अखिल भारतीय मराठी नाट्यासंमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळविणारे ते पहिले शाहीर होते. ते खऱ्या अर्थाने लोककलेचे ब्रँड अॅम्ब्रेसडर होते, ज्या काळात आधुनिक तंत्रज्ञान विकसित नसताना त्यांनी मोबाईल थिएटरचा प्रयोग केला होता. आज त्यांच्यावर आलेल्या चित्रपटाकडे मात्र मराठी माणसाने पाठ फिरवल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसात अनेक राजकीय पक्षांनी काही चित्रपटांचे मोफत शो चे आयोजन केले होते. त्यात प्रामुख्याने वर्षभरातीलच चित्रपटांचा विचार केला तर काश्मीर फाईल्स, हर हर महादेव, धर्मवीर, पावनखिंड या चित्रपटांचा समावेश होता. या चित्रपटांचे मोफत शोचे आयोजन करण्यामागे या पक्षांचा राजकीय स्वार्थ होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ज्या शाहीरांनी महाराष्ट्राचे अभिमान गीत गायले प्रत्येक मराठी माणसाची छाती या गिताने आजही अभिमानाने फुगते त्या शाहीरांची ओळख नव्या पिढीला करण्यासाठी राजकीय पक्षांनी तसेच सरकारी पातळीवर देखील पुढाकार घेतला पाहीजे होता. मात्र असे होताना दिसले नाही ,कारण आता राजकारण असो किंवा कोणतेही क्षेत्र असो त्यात आपला स्वार्थ पाहिला जातो.
राज्यातील शेतकरी असो किंवा कष्टकरी असो सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला अत्याचारावर शाहीरांनी आपल्या डफावर थाप माऊन व्यवस्थेविरोधात रान पेटविले असते मात्र आता महा आघाडी आणि महा युतीच्या महा राजकारणात मात्र महाराष्ट्राचा आत्मा हरवत चालला आहे. प्रत्येक राजकीय पक्षात केवळ आपल्या नेत्यांचे आत्मस्तुतीपर पोवाडे गायले जात आहे. राजकीय फायद्यासाठी इव्हेंट करत लोकांचे बळी घेतले जात आहेत. समाजातील भंपकपणा आणि अंधश्रध्दा यावर प्रबोधन करणारे शाहीर कुठे आणि आपल्या अनुयानांना राजकारण्यांच्या दावणीला बांधणारे सध्याचे आध्यात्मिक गुरू कुठे? मराठवाडा मुक्ती संग्रामचे अमृत महोत्सवी वर्ष असताना याबाबत विशेष प्रस्ताव गेल्या दोन अधिवेशनात आणण्यात आलेला नाही. नव्या पिढीला मराठवाडा मुक्ती संग्रामचा इतिहास माहीत व्हावा याबाबत सरकारच उदासीन असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नव्या पिढीला असा जुना इतिहास कळणार तरी कसा?
शाहीर साबळे यांचे 2023 हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने सरकारकडून अद्याप ना कोणता प्रस्ताव ना कोणती घोषणा करण्यात आली, राज्यकर्ते आणि विरोधक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून आपापले राजकीय समीकरण तयार करण्यात व्यस्त आहे. त्यातल्या त्यात सरकारने शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीताला या वर्षात राज्यगीताचा दर्जा दिला. मराठी वाहिन्यांवर असलेल्या सांगितीक कार्यक्रमातही अनेक कलाकारांवर विशेष भाग त्यांच्या गाण्यावर केले जातात पण ज्या शाहीर अमर शेख, विठ्ठल उमप, शाहीर साबळे जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या लोककलेचे पाईक होते, त्यांच्यावर मात्र कोणताही विशेष कार्यक्रम घेतल्याचे दिसत नाही. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विविध गायकांनी महाराष्ट्र गीत त्याच तडफेने गायले, जोपर्यंत हे गीत वाजत राहणार तोपर्यंत शाहीर साबळे यांची आठवण येत राहणार आणि भूतलावर शेवटचा मराठी माणूस असेपर्यंत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत गायले जाणार!








