आचार्य अत्रे आज असते तर सीमाप्रश्नासाठी मोठा लढा उभारला असता,
तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांचे मत
प्रतिनिधी/ मुंबई
सीमाभागातील मराठी बांधव आज कर्नाटकतील तुरूंगात जणू बंदिवान असल्याची परिस्थिती असून सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्राला आक्रमक भूमिका घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी केले. आचार्य अत्रे यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त मुंबई मुलुंड येथील मराठा मंडळ सभागृहात बेळगाव-कारवार सीमाप्रश्न व आचार्य अत्रे यांचे योगदान या विषयावर डॉ. ठाकुर बोलत होते.
यावेळी डॉ. ठाकुर यांनी संयुक्त महाराष्ट्र लढा, सीमालढ्यातील काही विशेष प्रसंग सांगत अद्यापही हा प्रश्न सोडवला जात नसल्याची खंत व्यक्त केली. कार्यक्रमाला आचार्य अत्रे यांचे नातू राजेंद्र पै, बिना पै, नातू हर्षवर्धन देशपांडे, पणतू अॅड. अक्षय राजेंद्र पै असे अत्रे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसाला लढावंच लागेल. अत्रे यांनी असंख्य जणांना सोबत घेत संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला. सर्वांच्या लढ्यातून संयुक्त महाराष्ट्र झाला असला तरी या लढ्यात आचार्य अत्रे यांचे मोठे योगदान होते. संयुक्त महाराष्ट्र समितीला प्र. के. अत्रे यांनी सर्वात आधी निधी दिला. अत्रे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सरसेनापती होते. अत्रे यांचे माझ्याशी वेगळेच नाते असल्याने आचार्य अत्रे यांच्या नावाने तीन पुरस्कार मला मिळाले आहेत. आज आचार्य अत्रे असते तर बेळगाव प्रश्न राहिला नसता. त्यांनी पुनर्जन्म घेऊन सीमाप्रश्न सोडवावा, अशी भावनिक सादही डॉ. किरण ठाकुर यांनी घातली.
ते म्हणाले, 1986 साली सीमा समिती पुन्हा जिवंत करत शिवसेनेच्या मनोहर जोशी यांना विनंती करण्यात येऊ लागली. मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावामुळे रोज संघर्ष करावा लागत आहे. सीमाप्रश्नासाठी केंद्रीय इच्छाशक्ती आवश्यक असून पूर्वीच्या महाजन समितीतील महाजन यांना हिमाचल प्रदेशमध्ये बंगला, बढती आणि बरेच काही दिल्याचे बिंग अत्रे यांनी त्यांच्या लेखातून फोडले असल्याचे ठाकुर यांनी सांगितले. तसेच वडील बाबुराव ठाकुर आणि प्र. के. अत्रे यांचे चांगले संबंध होते. चंदगड भागातून ठाकुर यांना निवडणूक तिकीट मिळाल्यावर अत्रे प्रचारासाठी आल्याची आठवण डॉ. किरण ठाकुर यांनी सांगितली.
दरम्यान प्रा. प्र. के. अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै म्हणाले, साने गुरुजी यांची 125 वी जयंती सुरु होत असून प्रा. अत्रे यांची ही जयंती असा हा सुवर्णयोग आहे. आचार्य अत्रे यांच्यामुळेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. यावेळी पै यांनी पंढरपूर येथील साने गुरुजी यांच्या उपोषणाचा प्रसंग सांगताना अत्रे यांचे कार्यमहत्त्व स्पष्ट केले. येथील मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. त्यासाठी साने गुरुजी उपोषणाला बसले. आठव्या दिवशी प्रकृती ढासळली. साने गुरूजी यांच्या उपोषणाला अत्रे लेख लिहून पाठिंबा देत. मात्र साने गुरुजींची प्रकृती धोक्यात आल्यावर अत्रे पंढरपूर येथे गेले. तिथे अत्रे यांनी सभेत बोलायला सुरुवात केल्यावर पोलिसांनी अत्रेंना बाहेर काढण्यास सांगितले. मात्र ते आंदोलन जिंकले. अत्रे यांनी सर्वांना आत्मसंशोधन करण्याची देणगी दिली असल्याचे पै म्हणाले. यावेळी शिरीष पै यांनी आचार्य अत्रे पुरस्कारासाठी किरण ठाकुर यांचे प्रथम नाव सुचवले असल्याची आठवण राजेंद्र पै यांनी सांगितली.
पत्रकार कुमार कदम म्हणाले, डॉ. किरण ठाकुर यांच्यामुळेच सीमाप्रश्न जिवंत राहिला. त्यांनीच सीमाप्रश्न दिल्लीपर्यंत लावून धरला. सीमा चळवळ उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठी माणूस आर्थिक पाया भक्कम राहिला नाही तर उभे राहू शकत नाही असे डॉ. किरण ठाकुर यांनी सांगत बांगलादेशातील युनूस यांचे कार्य त्या ठिकाणी जाऊन ठाकुर यांनी पाहिले. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे व्हीडिओ रेकॉर्डिंग कदम यांनी केले असून या चळवळीत अत्रे प्रमुख होते. मात्र ते सर्व धुळखात पडलं असून प्राचार्य अत्रे जयंती सरकारने साजरी करणे आवश्यक असल्याचे कुमार कदम म्हणाले.
यावेळी आचार्य अत्रे करंडक आणि सन्मान चिन्हाचे डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.









