साहेब-दादांमध्ये खडाजंगी : राजकारणातील संघर्ष आता कुटुंबातही
प्रतिनिधी/ मुंबई
अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा दिल्यानंतर गेले दोनतीन दिवस राज्यातील वातावरण ऐन पावसाळ्यात तापले होते. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर बुधवारी दोन्ही गटांनी मुंबईतच बैठकांच्या नावाखाली शक्तिप्रदर्शन करताना अक्षरश: गौप्यस्फोटांची मालिकाच लावली. दोन्ही गटांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे काका-पुतण्यातील खडाजंगी महाराष्ट्रातील जनतेने पाहिली आणि महाराष्ट्राचे राजकारण छिन्नविछिन्न झाल्याचेही अवघ्या काही तासांमध्ये अनुभवले. साहेबांच्या गटाची बैठक नेहमीप्रमाणे यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये झाली. तर दादांनी वांद्रा येथील एमईटी कॉलेजमधून गौप्यस्फोटांचे धडाके केले. एकीकडे मुंबईत बैठकांचे सत्र सुऊ असतानाच दोन्ही गटांनी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेत राष्ट्रवादी आपलीच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नाही म्हटले तरीही पुन्हा न्यायालयीन लढा, कायद्याचा काथ्याकूट, पुन्हा दावे-प्रतिदावे या गेल्या वर्षभर सुऊ असणाऱ्या गोष्टीच पहावयास मिळणार असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाकडे दादांच्या गटाने 30 जून रोजीच पत्र दिल्याचेही उघड झाले असून त्यामध्ये अजितदादाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेनेप्रमाणेच खरी राष्ट्रवादी कोणती हा प्रश्न आणखी काहीकाळ घोंघावत राहणार आहे. दादांच्या गटाच्या या चालीची माहिती मिळताच साहेबांच्यावतीनेही निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करताना आपले म्हणणे ऐकल्याशिवाय निकाल देऊ नये, अशी मागणी केली आहे. या बैठकानंतर मात्र राज्यात पुन्हा अस्थिर वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बैठकीमध्ये अजितदादांनी थेट साहेबांवरच शरसंधान केले आहे. 83 वय झालंय आतातरी तुम्ही थांबणार की नाही, अशी वेदना मांडतानाच मे महिन्यातील राजीनामानाट्यावरही परखड बोलून आपली संतप्त भावनाही व्यक्त केली. 2019 च्या निवडणुकीमध्ये 53 आमदारांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्याच्या यादीची झेरॉक्सही आपल्याकडे असल्याचे सांगत पवार यांच्या दुटप्पी वर्तनाचा दाखला दिला. दादांच्या बैठकीला सुमारे 32 आमदार उपस्थित होते. दुसरीकडे शरद पवार यांनीही आक्रमक भूमिका घेत अजित पवार गटाचे नाणे जनतेत चालणार नाही. लोकशाहीमध्ये फुटीर गटाने पक्षाचा ताबा घेणे योग्य नाही. मला पांडुरंग म्हणता आणि माझ्यावरच आरोप करता, माझ्याशिवाय तुमचे नाणे चालणारच नाही, असेही बजावण्याचा प्रयत्न केला. साहेबांच्या या बैठकीला सुमारे 18 आमदार उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनीही वडिलांची बाजू घेताना वय केवळ आकडा असतो. लढण्याची जिद्द लागते तीच तुमच्याकडे नाही, असे सांगत संयम बाळगण्याचे अप्रत्यक्षपणे सुचवले. तर राजकारणातील संघर्ष कुटुंबात आणणार नाही, असे शरद पवार यांनी कितीही म्हटले असले तरी आजच्या या गौप्यस्फोट मालिकेनंतर हा संघर्ष पवार कुटुंबांचा उंबरठा ओलांडून आत गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. आणि ‘काका मला वाचवा…’ ऐवजी ‘काकांपासून पक्ष वाचवा’ अशी अजित पवार यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना साद घातल्याचेही राजकीय वर्तुळामध्ये म्हटले जात आहे. महाराष्ट्रात या घटना घडत असल्या तरीही शरद पवार यांचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व लक्षात घेता राज्यातील सर्वच घडामोडी आणि घटनांवर अवघ्या देशाचेही लक्ष लागून राहिले आहे. आगामी काही दिवसांमध्ये हा लढा निश्चित कोणत्या स्तराला जातो की हे वादळ शमणार हे राज्याला-देशालाही दिसणार आहे.
तुमचं आता 83 वय झालं… आशीर्वाद देणार की नाही?
अजित पवारांचे थेट शरसंधान
नोकरी करणारा कोणताही माणूस 58 व्या वर्षी निवृत्त होतो. प्रशासकीय अधिकारी 60 व्या वर्षी निवृत्त होतो. भाजपात नेत्यांना 75 व्या वर्षी निवृत्त केले जाते. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी ही त्याची उदाहरणे आहेत. तुमचे तर 82 झाले, 83 झाले, तुम्ही आता थांबून आम्हाला आशीर्वाद देणार आहात की नाही? असा सवाल अजित पवार यांनी शरद पवार यांना केला. राष्ट्रवादीच्या नऊजणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राजकारणातला संघर्ष कुटुंबापर्यंत येऊ देणार नाही, असे म्हणणाऱ्या शरद पवार यांच्यावरच अजित पवार यांनी बुधवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दुटप्पीपणाचा आरोप केला.
अजितदादा म्हणाले, विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीनंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपमध्ये जायचे नव्हते तर आम्हाला शपथविधीच्या कार्यक्रमाला का पाठवले? 2017 मध्ये भाजपबरोबर जाण्यासाठी बैठका घेतल्या. मात्र भाजपने शिवसेनेची साथ सोडण्यास नकार दिला. 2019 मध्येही भाजपबरोबर जाण्याचे ठरले होते. मात्र भाजप जातीय पक्ष असल्याचा अचानक साक्षात्कार झाला. पहाटेचा शपथविधीही वरिष्ठांच्याच सल्ल्याने झाला होता. भाजप जातीय पक्ष वाटला मग शिवसेना जातीय पक्ष नव्हता का? असे अनेक प्रश्न करत प्रत्येक वेळा आम्हाला पुढे करायचे आणि आपण माघार घ्यायची असे करत आपली व्हिलनची प्रतिमा तयार करण्यात आली, असा आरोप केला. शरद पवार यांच्या दुटप्पी धोरणामुळेच आपण राज्याच्या विकासासाठी शिंदे फडणवीस यांच्या सरकारला समर्थन दिल्याचा घणाघात केला, शरद पवार यांचे नाव न घेता संपूर्ण भाषणात आमचे वरिष्ठ असा उल्लेख करण्यात आला.
मान्य नव्हते तर भाजपला पाठिंबा का?
भाजप आणि राष्ट्रवादी संबंधाबाबत अजित पवार म्हणाले, 2014 मध्ये भाजपला स्वत:हून पाठिंबा द्यायला का तयार झाला? प्रथमच मुख्यमंत्री होणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला जाण्यासाठी का सांगितले? 2017 ला शिवसेना जातीयवादी होती, मग 2019 ला आघाडीसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? 2019 मध्ये भाजपसोबत 5 बैठका झाल्या, मात्र फडणवीसांसह मला गप्प राहायला का सांगितले? शिंदेच्या बंडावेळी भाजपसोबत जाण्यासाठी 53 आमदारांच्या सह्यांसह पत्राचा ड्राफ्ट तयार होता. मात्र तेव्हा साहेबांनी वेगळी भूमिका घेतली. आमचे मत मान्य केले नाही, असे भाजपबरोबरच्या संधानाचे अनेक दाखले त्यांनी दिले. मात्र प्रत्येकवेळी मलाच व्हिलन ठरविण्यात आले, असा त्रागाही त्यांनी केला.
भाजप बरोबर जाण्याचा प्रस्तावाला पाठिंबा नाही
उद्धव ठाकरे यांच्या नेतफत्वाखाली उपमुख्यमंत्री केले. मी कधी हूँ की चूँ केले नाही. कोरोना काळातही हलगर्जीपणा केला नाही. शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्याचे सांगितले. उद्धव ठाकरेंना सांगितले. पण कुणी लक्ष दिले नाही. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले. त्यावेळी आम्ही 51 आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला. पण वरिष्ठांनी निर्णय घेतला नाही, असे अनेक गौप्यस्फोट करत त्यांनी थेट निशाणा साधूनही शरद पवार आजही माझे दैवत आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
2024 मोदीच निवडून येणार
शेवटी अनेकदा हे सर्व आमदार मला सांगत होते दादा तुम्ही काहीतरी करा. 2019 चे आम्हाला माहित नव्हते. तुम्ही आता काही पावले उचलली तर आम्ही तुम्हाला साथ देऊ. आज नरेंद्र मोदींचा करीश्मा देशात आहे. 2014 च्या निवडणुकीत एकट्या नरेंद्र मोदींकडे पाहून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भाजप सत्तेवर आला आहे. 2019 ला पुन्हा त्यांना निर्विवाद बहुमत मिळाले आहे. आणि 2024 मध्येही नरेंद्र मोदीच निवडून येणार आहेत, असे आमच्या वरिष्ठांनीही आमच्याशी बोलताना सांगितले आहे, असेही अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र पिंजून काढणार
आम्ही वडीलधाऱ्यांचा आदर करतो आहोत. निवडून आल्यावर आमच्या आमदारांनी विकास करावा, हीच जनतेची अपेक्षा असते. सगळ्यांच्या साथीने आपल्याला पुढे जायचे आहे. 71 वऊन आपण खाली आलो. 2004 ला खासदारही कमी होते, नंतरही ते चार, आठ, सात यापेक्षा पुढे आपण गेलो नाही हे वास्तव आहे. आपला पक्ष वाढला पाहिजे. खासदार, आमदारांची संख्या वाढली पाहिजे. नवे कार्यकर्ते, नव्या महिला कार्यकर्त्या पुढे आल्या पाहिजेत. 25 वर्षांनी नवी पिढी पुढे येते, 50 वर्षांनी दुसरी पिढी येते, 75 वर्षांनी तिसरी पिढी येते. हे चक्र आहे. आता आपल्या पक्षाने 25 व्या वर्षात पदार्पण पेले आहे. तेव्हा नव्याने महाराष्ट्र पिंजून काढत पक्षाला नव्याने वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धारही अजित पवार यांनी केला.
तुम्ही शतायुषी व्हा…पण
अजित पवार म्हणाले, तुम्ही शतायुषी व्हा. पण राजकारणातून तुम्ही आता बाजूला व्हा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. आता नवी पिढी पुढे येत आहे. तुम्ही आशीर्वाद द्या ना, चुकले तर सांगा की अजित तुझे चुकले. कान धरा, चूक मान्य करून दुरूस्त करून पुढे जाऊ. पण हे कुणासाठी चालले आहे? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का, असे म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले.
अजितचे नाणेच खोटे, खणकन वाजणार नाही
शरद पवार कडाडले
अजित पवार यांचे नाणेच मुळात खोटे आहे. त्यामुळेच त्यांच्या बैठकीत आणि मेळाव्यात माझा मोठा फोटो लावण्यात आला आहे, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली. अजित पवारांचे आरोप टाळत पक्षाची निशाणी जाऊ देणार नाही, असा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धीर देत शरद पवार यांनी कायदेशीर लढ्याचे संकेत दिले. बुधवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये घेतलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
शरद पवार यांनी आपण न्यायालयात वगैरे न जाता जनतेच्या न्यायालयात जाऊ असे म्हटले होते. शनिवार 3 जुलै रोजी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या दर्शनानंतर ते महाराष्ट्राचा दौराही करणार होते. मात्र राष्ट्रवादीतला सत्तासंघर्ष विकोपाला जाण्याची चिन्हे दिसताच ते 3 जुलै रोजी रात्रीच मुंबईत परतले.
काही लोक भाषणात शरद पवार आमचे गुऊ आहेत असे सांगत होते. त्यांच्या मेळाव्यात सगळ्यात मोठा फोटो माझा होता. मुंबईत पोस्टरवर माझाच फोटो आहे. त्यांना माहीत आहे की त्यांचे नाणे चालणार नाही. त्यामुळे चालणारे नाणे घेतले पाहिजे. त्यांचे नाणे खणकन वाजणार नाही. अडचण नको म्हणून त्यांनी माझा फोटो वापरला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला बडवे जाऊ देत नाहीत, असाही आरोप झाला. पण पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे असेल तर कुणी अडवत नाही. पांडुरंग म्हणायचे, गुऊ म्हणायचे आणि आमच्याकडे दुर्लक्ष झाले म्हणायचे ही गंमतीची गोष्ट आहे, असेही शरद पवार म्हणाले.
बघायला गेले, शपथ घेऊन मोकळे झाले
आपले एक सहकारी म्हणाले की, जे काही चालले आहे ते बरोबर नाही. काय चालले आहे ते बघून येतो आणि तुम्हाला कळवतो. मात्र नंतर त्यांनी शपथ घेतल्याचाच फोन केला, असे म्हणत शरद पवार यांनी छगन भुजबळांना टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला
पंतप्रधान बारामतीत आले असता त्यांनी देश कसा चालवायचा हे पवारांचे बोट धरून शिकल्याचे सांगितले. नंतर निवडणुकीच्या काळात प्रचंड टीका केली. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांनी बोलत असताना काळजी घ्यावी लागते. सत्य आहे तेच सांगितले पाहिजे. पण तेवढी धमक पंतप्रधानांनी दाखवली नाही. आपण देशाचे नेता म्हणून बोलतो त्यावेळी मर्यादा पाळली पाहिजे. त्या मर्यादा पाळल्या जात नाही. वाट्टेल ते बोलून जनमानसात एक प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असेही शरद पवार म्हणाले.
आजची बैठक ही ऐतिहासिक बैठक आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आपल्या बैठकीकडे आहे. पक्षाची स्थापना केल्यानंतर आज 24 वर्षे झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतफत्वाची फळी उभी करण्याचे यश राष्ट्रवादीला आले. कुणी आमदार झाले, कुणी खासदार झाले, कुणी नगरसेवक झाले. सामान्य कुटुंबातला कार्यकर्ताही राज्य चालवू शकतो हे राष्ट्रवादीने दाखवून दिले. आपण अनेक नवे नेते तयार केले. मनात एकच बाब होती ती म्हणजे महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा. या राज्यातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची. आज आपल्याला आणखी पुढे जायचे आहे. संकटे खूप आहेत, ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशा लोकांकडे देशाची सूत्रे आहेत. एखादी भूमिका योग्य नसेल तर चर्चा व्हायची. संवाद व्हायचा, पण आज तो संवाद संपला असल्याच खंत पवार यांनी व्यक्त केली.
आज देशामध्ये कमालीची अस्वस्थता आहे. लोकशाही टिकवायची असेल तर संवाद सुऊ करण्यासाठी आम्ही काही लोकांनी प्रयत्न सुऊ केले. त्यासाठी आम्ही सत्ताधारी पक्षात जे नाहीत त्यांना बरोबर घेऊन चर्चा केली. 17 आणि 18 तारखेलाही आम्ही एकत्र येत आहोत. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. देशाच्या पंतप्रधानांनी आठ दिवसांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. राज्य सहकारी बँक आणि पाटबंधारे खाते याचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही गोष्टीची पूर्ण माहिती नसताना कमी माहितीच्या आधारावर भाष्य करणे अपेक्षित नसते, असेही पवार म्हणाले.
हिंदुत्वावरही भाष्य
शिवसेनेचे हिंदुत्व हे अठरापगड जातीचे आहे. सर्वसमावेशक आहे, तर भाजपचे हिंदुत्व हे संकुचित विचारसरणीचे आहे. फोडाफोडीचे आहे, अशी टीका पवार यांनी केली.
तक्रार नाही, पण दु:ख
महाराष्ट्रात काही लोकांनी बाजूला जायची भूमिका घेतली. माझी तक्रार नाही पण दु:ख आहे. कारण लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. कार्यकर्त्यांनी अपार मेहनत केली होती. जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्याच विचारांच्या पंक्तीला जाऊन बसणे योग्य नाही. एवढेच मला सांगायचे आहे. काही लोक पक्षाची प्रॉपर्टी ताब्यात घेतात. पक्ष आमचा आहे, घड्याळ आमचे आहे असा दावा करतात. पण चिन्ह कुठेही जाणार नाही आणि जाऊ देणार नाही. जोपर्यंत आपल्या पक्षाचा विचार सामान्य माणसाच्या अंत:करणात आहे, तोपर्यंत काहीही चिंता करण्याचे काहीही कारण नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले.